मकरधोकडा अपहरण प्रकरण : ‘त्या’मुलीचा अद्यापही शोध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 01:45 PM2021-09-30T13:45:29+5:302021-09-30T13:47:39+5:30

२६ सप्टेंबरला मकरधोकडा दत्तनगर झोपडपट्टीतून शौचास गेल्यानंतर ‘ती’ घरी परत आलीच नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसरसुद्धा पिंजून काढला. मात्र, कोणत्याही प्रकारे या प्रकरणाचा धागाच जुळून येत नसल्याने पोलीससुद्धा संभ्रमात अडकले आहेत. 

‘That’ girl is still undiscovered | मकरधोकडा अपहरण प्रकरण : ‘त्या’मुलीचा अद्यापही शोध नाही

मकरधोकडा अपहरण प्रकरण : ‘त्या’मुलीचा अद्यापही शोध नाही

Next
ठळक मुद्देपोलिसांची शोधमोहीम सुरूच

नागपूर : चार दिवसांपासून अचानकपणे गायब झालेल्या नऊवर्षीय कविता (नाव बदललेले) या मुलीचा अद्याप सुगावा लागलेला नाही. शिवाय या प्रकरणाचा धागाही पोलिसांना गवसला नाही. रात्रंदिवस एक करीत तपास यंत्रणा सर्व स्तरावर लावल्यानंतरही ‘त्या’ दिवशी ‘त्या’ चिमुकलीसोबत नेमके काय घडले असावे, यावरही सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२६ सप्टेंबरला मकरधोकडा दत्तनगर झोपडपट्टीतून शौचास गेल्यानंतर ‘ती’ घरी परत आलीच नाही. आजी-आजोबा आणि मामा तिघेही घरी असताना काही अंतरावरच ‘ती’ शौचास गेली होती. अर्ध्या-एक तासातच तिची शोधाशोध सुरू झाली. शौचास बसलेल्या परिसरात डबा पडून होता. ज्या ठिकाणी ती शौचास गेली होती, तो मार्ग बुटीबोरीच्या दिशेने जातो. दुसरा मार्ग हा गावातून थेट पारडगाव या गावाच्या दिशेने नागपूरकडे जातो. सोबतच तिसऱ्या मार्गावर उमरेड आहे. मकरधोकडा परिसर जंगलांनी वेढलेला असून, पोलिसांनी संपूर्ण परिसरसुद्धा पिंजून काढला. कोणत्याही प्रकारे या प्रकरणाचा धागाच जुळून येत नसल्याने पोलीससुद्धा संभ्रमात अडकले आहेत. 

केवळ पैशासाठी अपहरण ही बाब आता आर्थिक परिस्थितीमुळे मागे पडली असून, जादूटोणा, अपहरण करून पैसा कमविणे अथवा अन्य कारणांची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. ज्या परिसरात ती मुलगी वास्तव्याला होती. तो संपूर्ण परिसर झोपडपट्टीचा आहे. शिवाय परिसरात जुगार, सट्टा आणि चोरी, आदींच्या घटना नेहमीच्या दिसून येतात. यामुळे त्यादृष्टीनेही नागपूर वा बुटीबोरी ‘कनेक्शन’ आहे की नाही, याकडेही यंत्रणेची नजर आहे.

सायबर लागली कामाला

मागील चार दिवसांपासून पोलिसांनी सुमारे १० ते १५ किलोमीटरचा पट्टा अक्षरश: पालथा घातला आहे. जंगल, तलाव, नदीकाठचा परिसरातही पोलीस पोहोचले आहेत. दुसरीकडे सायबर चमूनेही अत्यंत बारकाईने निरीक्षण करीत शोधमोहीम हाती घेतल्याचे दिसून येते. शिवाय नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे संपूर्ण यंत्रणेसह बारकावे शोधत आहेत. अजूनही मकरधोकडा परिसरात पोलीस मुक्कामी असून, याप्रकरणी थोडा जरी धागा मिळाला तरी नेमक्या घटनेपर्यंत पोलीस पोहोचतील, असा विश्वास संपूर्ण यंत्रणेचा आहे.

सातत्याने शोधमोहीम सुरू आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून, बारकाईने चौकशी केली जात आहे. आतापर्यंत २५ ते ३० जणांची चौकशी करण्यात आली आहे.

यशवंत सोलसे

पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, उमरेड

Web Title: ‘That’ girl is still undiscovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.