बलात्कारानंतर मुलीची आत्महत्या; आरोपीला दहा वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2023 21:23 IST2023-04-19T21:22:29+5:302023-04-19T21:23:04+5:30
Nagpur News शिकवणी वर्गातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बुधवारी १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला एकूण २२ हजार ५०० रुपयाचा दंड ठोठावण्यात आला.

बलात्कारानंतर मुलीची आत्महत्या; आरोपीला दहा वर्षांचा कारावास
नागपूर : शिकवणी वर्गातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बुधवारी १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला एकूण २२ हजार ५०० रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाचे न्या. राहुल भोसले यांनी हा निर्णय दिला.
सत्या उर्फ शुभम उर्फ सत्यनारायण रामलाल भंडारी (२६) असे आरोपीचे नाव असून, तो बेलदारनगर, नरसाळा रोड येथील रहिवासी आहे. या घटनेच्या वेळी पीडित मुलगी १७ वर्षे वयाची होती. या घटनेनंतर तिने आत्महत्या केली. आरोपी तिच्या मैत्रिणीच्या ओळखीचा होता. ते एकाच शिकवणी वर्गात होते. दरम्यान, आरोपीने पीडित मुलीसोबत काही छायाचित्रे काढली होती. आरोपीने ती छायाचित्रे अश्लील करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि २३ ऑगस्ट २०१९ रोजी तिला अपहरण करून बैतुलला नेले.
दरम्यान, आरोपीने मित्राच्या घरी मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तो मुलीला विकण्यासाठी रेल्वेने दुसरीकडे घेऊन जात होता. मुलीला त्याच्यावर संशय आल्यामुळे तिने आरडाओरड केली. त्यामुळे आरोपी तिला मारहाण करायला लागला. परिणामी, इतर प्रवाशांनी आरोपीला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढे रेल्वे पोलिसांनी मुलीला आईच्या तर आरोपीला नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचा मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने काही दिवसांनंतर आत्महत्या केली. ती नागपूर येथे मामाकडे राहत होती. सहायक पोलिस उपनिरीक्षक स्नेहलता जायभाये यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. दीपिका गवळी यांनी कामकाज पाहिले.