गिरीशभाऊ राजकारणापलिकडचे व्यक्तिमत्त्व

By Admin | Updated: March 8, 2015 02:34 IST2015-03-08T02:34:08+5:302015-03-08T02:34:08+5:30

गिरीश गांधी यांच्याशी माझे जवळचे संबंध आहेत. ९० टक्के लोक ढोंगीपणाने वागत असताना त्यांच्यातला सच्चेपणा मी अनुभवला आहे.

Girishbau Political Person's Personality | गिरीशभाऊ राजकारणापलिकडचे व्यक्तिमत्त्व

गिरीशभाऊ राजकारणापलिकडचे व्यक्तिमत्त्व

नागपूर : गिरीश गांधी यांच्याशी माझे जवळचे संबंध आहेत. ९० टक्के लोक ढोंगीपणाने वागत असताना त्यांच्यातला सच्चेपणा मी अनुभवला आहे. त्यामुळेच गिरीशभाऊ कुठल्याही पक्षात असले, नसले तरी त्यांचा आदर आहे. सर्वच पक्षाच्या लोकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत आणि ते राजकारणापलिकडचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाचे प्रतिष्ठान समाजाला उपयोगी काम करीत राहील याचा विश्वास वाटतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले.
साई सभागृह, शंकरनगर येथे गिरीश गांधी यांच्या मित्र परिवारातर्फे गिरीश गांधी प्रतिष्ठानचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तो बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, अजय पाटील, माधवराव देशपांडे, अरुण वानखेडे, संतोष क्षीरसागर, नंदकिशोर पनपालिया प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गिरीश गांधी सर्व पक्षातल्या नेत्यांना मार्गदर्शन करणारे नेते आहेत. एखादा अपवाद वगळता त्यांचे मी ऐकले नाही, असे सहसा होत नाही. निवडणुकीत त्यांनी माझ्यावर आणि पक्षावर केलेली टीका मला कधीच बोचली नाही.
राजकारण समाजासाठी करायचे सत्तेसाठी नाही, हे त्यांनीच बिंबविले आहे. त्यांची आणि माझी मैत्री असली तरी मतभिन्नता आहे, पण त्यामुळे आमच्यात कधी दुरावा आला नाही. मतभिन्नतेपेक्षा विचारशून्यता जास्त घातक आहे. गिरीशभाऊंनी जो विचार दिला तो या प्रतिष्ठानच्यावतीने अधिक समोर जावा, असे आवाहन त्यांनी केले. कधीही लाचारी न पत्करणाऱ्या आणि परखड बोलणाऱ्या गिरीश गांधी यांची समाजाला जास्त गरज आहे, असे गडकरी म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गिरीशभाऊंना गेले २० वर्षे मी पाहतो आहे. आदर्श आणि निष्कंलक चारित्र्य असणाऱ्या गिरीशभाऊंकडून मंत्री झाल्यावर अनेक संकल्पना मला मिळाल्या. त्यावर मी काम करीत आहे. एलईडी दिवे उपयोगात आणले तर ५० टक्के विजेची बचत होते. त्यासाठी त्यांनी एक लाख एलईडी दिवे शिर्डीत वितरित केले. यावर राज्य सरकारही आता काम करते आहे, असे ते म्हणाले.
मधुकर भावे म्हणाले, स्पष्ट बोलणारी माणसे आणि परखड लिहिणारे पत्रकार आज नाहीत. अशा वेळी स्पष्ट बोलणाऱ्या गिरीशभाऊंची जास्त गरज आहे. पानसरे, दाभोळकर यांची हत्या झाली पण समाज चूप आहे. यावर बोलले पाहिजे. समाजाचा गढूळपणा वाढत असताना तो थोपविण्याची शक्ती गिरीश गांधी यांच्यासारख्या व्यक्तींमध्येच आहे. त्यामुळे गिरीशभाऊंनी विदर्भासह कोकण, मराठवाड्याकडेही आता लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी प्रास्ताविकातून डॉ. अक्षयकुमार काळे यांनी प्रतिष्ठानचा उद्देश स्पष्ट केला. संचालन कोमल ठाकरे यांनी तर आभार अजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला गिरीश गांधी, महेश एलकुंचवार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Girishbau Political Person's Personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.