गिफ्टच्या आमिषात

By Admin | Updated: December 25, 2016 03:01 IST2016-12-25T03:01:55+5:302016-12-25T03:01:55+5:30

विदेशी मित्राकडून आलेले महागडे गिफ्ट मिळविण्याच्या प्रयत्नात एका महिलेने चक्क १७ लाख ४० हजार रुपये गमावले.

Gift Loves | गिफ्टच्या आमिषात

गिफ्टच्या आमिषात

नागपूर : विदेशी मित्राकडून आलेले महागडे गिफ्ट मिळविण्याच्या प्रयत्नात एका महिलेने चक्क १७ लाख ४० हजार रुपये गमावले. फसवणुकीची ही खळबळजनक घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. त्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून शनिवारी सकाळी मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सोनिया अलेक्झांडर सल्डाना (वय ४८) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या सादिकाबाद कॉलनीत राहतात. त्यांचे सदरमध्ये इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. काही महिन्यांपूर्वी सोनिया यांची फेसबुकवरून ब्रिक्स अ‍ॅन्डरसन याच्याशी मैत्री झाली. त्यानंतर या दोघांमधील आॅनलाईन संपर्क वाढला. आपण नार्क पोल्क कार्वीच (यूके) येथे राहतो.
सामाजिक कार्यात नाव असल्याचे सांगून जर्मनीने आपल्याला ‘बेस्ट वर्कर’चा पुरस्कार देऊन गौरविल्याची थाप ब्रिक्सने मारली. आपण खूप आनंदित असून, आपल्या मित्रांना गिफ्ट पाठवीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी दिल्लीवरून जान्हवीनामक तरुणीचा सोनिया यांना फोन आला. ब्रिक्स नामक व्यक्तीकडून तुम्हाला महागडे गिफ्ट आल्याचे तिने सांगितले.
हे गिफ्ट मिळविण्यासाठी विविध करापोटी तुम्हाला २७ हजार रुपये भरावे लागतील, असेही कळविले. सोनियांनी ती रक्कम जान्हवीने सांगितलेल्या खात्यात जमा केली. दरम्यान, कथित ब्रिक्स संपर्कातच होता. तुम्हाला पाठविलेल्या गिफ्टसोबत एक लिफाफा आहे, त्यात सरप्राईज असल्याचेही त्याने सांगितले.
वारंवार विचारणा करूनही नेमके काय गिफ्ट आहे आणि त्याची किंमत किती आहे, हे सांगण्यास त्याने नकार दिला. उत्सुकता वाढल्याने सोनियांनी जान्हवीशी संपर्क करून काय गिफ्ट आहे, ते विचारले. तिने हे गिफ्ट किमान २५ लाख रुपयांचे आहे, शिवाय लिफाफ्यातही डॉलरसारखे काही आहे, असे सांगून ते सोडविण्यासाठी पाच लाख रुपये जमा करावे लागतील, असे सांगितले. सोनिया यांनी पाच लाख जमा केल्यानंतर पुन्हा वेगवेगळे कारण सांगून त्यांना रक्कम जमा करण्यास सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Gift Loves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.