अतिप्रसंगानंतर तरुणीला विकण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:16 AM2017-07-24T02:16:11+5:302017-07-24T02:16:11+5:30

मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील १९ वर्षीय तरुणीला रामटेक तालुक्यातील खुमारी येथे आणले आणि महिनाभर खोलीत डांबून ठेवले.

Ghat | अतिप्रसंगानंतर तरुणीला विकण्याचा घाट

अतिप्रसंगानंतर तरुणीला विकण्याचा घाट

Next

खुमारी येथील घटना : महिनाभर खोलीत डांबून ठेवले
लोकमत न्यूज नेटवर्क
मनसर : मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील १९ वर्षीय तरुणीला रामटेक तालुक्यातील खुमारी येथे आणले आणि महिनाभर खोलीत डांबून ठेवले. एवढेच नव्हे तर तिला साखळीने बांधून तिच्यावर अत्याचारही करण्यात आला. तिला विकण्याचा घाट आरोपीने रचला होता. मात्र, रामटेक पोलिसांनी आरोपीला वेळीच अटक केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुमारी येथे नुकतीच घडली.
विनोद अमरसिंग जाधव (४०, रा. फुकटनगर, खुमारी, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विनोदच्या घरी कुणाला तरी डांबून ठेवले असल्याची कुणकुण स्थानिकांना लागली होती. त्यामुळे यासंदर्भात रामटेक पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच विनोदच्या घरी धाड टाकून झडती घेतली, तेव्हा सदर तरुणी त्याच्या घरातील खोलीत बंदिस्त असल्याचे तसेच सोफ्याला साखळीने बांधून ठेवले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तिला ताब्यात घेत विचारपूस केली असता, ती काहीही सांगण्याच्या स्थितीत नव्हती. ती मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील रहिवासी असून, तेथील दोघांनी तिला मोटरसायकलने महिनाभरापूर्वी खुमारी येथे आणले आणि विनोदच्या घरी सोडले.
तिला तीन-चार दिवसानंतर सोडून देण्याची सूचनाही त्या दोघांनी विनोदला केली होती.
मात्र, विनोदने गैरफायदा घेत तिला घरात डांबून ठेवले. एवढेच नव्हे तर तिच्यावर सतत अत्याचारही केला. त्याने सदर तरुणीला विकण्याची योजना आखली होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी भादंवि ३६३, ३४४, ३७६, ३७०, ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार योगेश पारधी करीत आहेत.

आरोपीला हद्दपार करा
या प्रकरणात विनोद हा एकटा नसून मोठे रॅकेट असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. विनोद जाधव हा मानवी तस्करी व देहविक्री व्यवसायात सक्रिय असून, त्याने यापूर्वीही काही महिलांना राज्याबाहेर विकल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्याला खुमारी गावातून तसेच परिसरातून हद्दपार करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
 

Web Title: Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.