घरकुलाला नगर परिषदेने लावले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:47+5:302021-07-31T04:09:47+5:30
रामटेक : एकात्मिक गृह निर्माण व झाेपडपट्टी विकास कार्यक्रम याेजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलात अवैधरीत्या ताबा घेऊन राहणाऱ्या काही व्यक्तीने अवैध ...

घरकुलाला नगर परिषदेने लावले सील
रामटेक : एकात्मिक गृह निर्माण व झाेपडपट्टी विकास कार्यक्रम याेजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलात अवैधरीत्या ताबा घेऊन राहणाऱ्या काही व्यक्तीने अवैध व्यवसाय करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. त्यामुळे नगर परिषदेने शुक्रवारी कारवाई करीत घरकूल क्र.५२ सील केले.
रामटेक नगर परिषदेने २० वर्षापूर्वी एकात्मिक गृह निर्माण व झाेपडपट्टी विकास कार्यक्रम याेजनेंतर्गत ७२ घरकूल बांधले. तेव्हा घरकूल वाटपात वादावादी झाली. काही घरकुलाचे वाटप झाले. यानंतर काही नागरिकांनी अवैध कब्जा केला. अजूनही काही लाेक अवैधपणे तेथे राहत आहे. नगर परिषदेला अद्यापही किती लाेक अवैधपणे राहत आहे याची कल्पना नाही. पण येथे काही व्यक्तीने दारूचा व्यवसाय सुरु केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत दाेनदा कारवाई करण्यात आली आहे. रामटेक पोलीस व दारुबंदी विभागाने येथे दारू पकडली आहे.
एवढे सगळे हाेत असताना सुद्धा नगर परिषद काहीच कारवाई करत नव्हती. शेवटी गुरुवारी रामटेक पोलिसांनी या ठिकाणी येथील अवैध धंदे बंद करण्यात यावे व घरकूल सील करण्यात यावे असे पत्र नगर परिषदेला दिले होते. या घरकुलात अवैधरीत्या राहत असलेल्या व्यक्तीवर केव्हा कारवाई करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या हे घरकुल राहणे याेग्य नाही. अनेक घरकुलांना गळती लागली आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारवाई प्रसंगी अभियंता गणेश अंदुरे, कनिष्ठ अभियंता सौरभ कावळे ,करविभाग प्रमुख महेंद्र जगदाडे, शिपाई दीपक आकरे, निल्या पडाेळे,गजानन महाजन ,जगदीश गवळीवार उपस्थित होते. यापुढेही कारवाई सुरूच राहील, असे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी सांगितले.