कुख्यात भुरूविरुद्ध खटल्यास प्रारंभ
By Admin | Updated: June 28, 2014 02:43 IST2014-06-28T02:43:27+5:302014-06-28T02:43:27+5:30
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टी येथील कुख्यात शेख अकरम ऊर्फ भुरू आणि टोळीविरुद्ध ...

कुख्यात भुरूविरुद्ध खटल्यास प्रारंभ
नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टी येथील कुख्यात शेख अकरम ऊर्फ भुरू आणि टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात शुक्रवारपासून कडेकोट पोलीस बंदोबस्तात खटल्याची सुनावणी प्रारंभ झाली. पहिल्याच दिवशी एका साक्षीदाराची साक्ष झाली. त्याची सरतपासणी साक्ष अर्धवट राहिली. ३० जूनपर्यंत या खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात आली. या खटल्यात अनुप अण्णाजी भोसले, शेख अकरम ऊर्फ भुरा ऊर्फ भुरू डॉन शेख रहेमान, आॅस्कर आॅस्टिन जोसेफ, कमलेश ऊर्फ पप्पू द्वारकाप्रसाद गुप्ता, सचिन केशरसिंग ठाकूर आणि विशाल नारायण रेड्डी हे आरोपी आहेत. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, भुरू हा वसंतराव नाईक झोपडपट्टीत जुगार आणि मादक पदार्थाचा अड्डा चालवायचा. त्याची व टोळीची या झोपडपट्टीत दहशत होती. २४ सप्टेंबर २०१२ जुगारातील पैशाच्या देवाणघेवाणीवरून या टोळीने रोहित जैन नावाच्या एका तरुणाला आर्वी येथून इनोव्हा कारने अपहरण करून वसंतराव नाईक झोपडपट्टीतील अड्ड्यावर आणले होते. त्याला भुरूने आपल्या ‘पीसीआर’ रूममध्ये नेऊन चामडी पट्ट्याने अमानवीय मारहाण केली होती. मारहाणीतच रोहित याचा मृत्यू झाला होता. पुढे त्याचा मृतदेह भुरू आणि साथीदारांनी एका झोपडीत खड्डा करून पुरून टाकला होता. ९ आॅक्टोबर २०१२ रोजी रोहितचा मृतदेह काढण्यावरून भुरूचे मोहल्ल्यातील लोकांसोबत भांडण झाले होते. त्याने काही जणांवर तलवारीने हल्ला केला होता. परिणामी मोहल्ल्यातील लोकांनी एकजूट करून भुरूच्या या साम्राज्याविरुद्ध एक प्रकारचा उठाव केला होता. संतापलेल्या जमावाने केलेल्या हल्ल्यात भुरूचा भाऊ इक्बाल हा ठार झाला होता तर भुरू स्वत:चा जीव वाचवून पळून गेला होता.
या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल होऊन सहायक पोलीस आयुक्त पी. पी. धरमशी यांनी तपास केला होता. जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे हे हा खटला चालवीत आहेत. बचाव पक्षाच्यावतीने अॅड. अविनाश गुप्ता, अॅड. आर. के. तिवारी, अॅड. प्रफुल्ल मोहगावकर आणि अॅड. पराग उके हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)