प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घ्या!
By Admin | Updated: July 21, 2014 00:55 IST2014-07-21T00:55:36+5:302014-07-21T00:55:36+5:30
मौदा तालुक्यातील कुंभारी या गावाचे पुनर्वसन करून येथील तरुणांना प्रशासनाने नोकरीत सामावून घ्यावे, असे निर्देश आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एनटीपीसी वीज प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घ्या!
एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा : चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
नागपूर : मौदा तालुक्यातील कुंभारी या गावाचे पुनर्वसन करून येथील तरुणांना प्रशासनाने नोकरीत सामावून घ्यावे, असे निर्देश आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एनटीपीसी वीज प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.
मौदा परिसरातील एनटीपीसीच्या वीज प्रकल्पासाठी कुंभारी गावाचे तसेच येथील शेतांचे अधिग्रहण करण्यात आले. या प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी शनिवारी एनटीपीसीच्या कार्यालयात वीज प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात आ. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी आ. बावनकुळे यांनी सांगितले की, या वीज प्रकल्पासाठी कुंभारी गाव व येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे अधिग्रहण करण्यात आले. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. येथील प्रकल्पग्रस्तांना त्यांचे प्रमाणपत्र देणे, त्यांना नोकरीत सामावून घेणे आवश्यक आहे. या प्रकल्पातील राख (फ्लाय अॅश) साठवून ठेवण्यासाठी धामणगाव येथील जागा अधिग्रहित करण्यात आली. त्यामुळे संबंधितांना एकरी ४० लाख रुपये मोबदला देण्यात यावा, महाराष्ट्र शासन पुनर्वसन प्राधिकरणासमोर करण्यात आलेल्या करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्त गावांमध्ये मूलभूत व पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, प्रत्येक प्रकल्पबाधित गावाला सीएसआर निधीतून दोन कोटी रुपयांचा तसेच रेल्वेबाधित गावाला ५० लाख रुपयांचा निधी विकास कार्यासाठी उपलब्ध करून द्यावा, कुंभारी गावाचे पुनर्वसन नागपूर-भंडारा महामार्गालगत करण्यात यावे, एनटीपीसी रेल्वे लाईनच्या बाबदेव वळणमार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, यासह अन्य महत्त्वाच्या सूचना आ. बावनकुळे यांनी केल्या.
या सर्व निर्देशांची टप्प्याटप्प्याने पूर्तता करण्यात येणार असून, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती एनटीपीसीचे समूह महाप्रबंधक व्ही. थंगपांडियन यांनी दिली. बैठकीला अप्पर महाप्रबंधक (मानव संसाधन) व्ही. शिवप्रसाद, व्यवस्थापक प्रशांत सिंग, अभियंता विजयानंद बडोदेकर, उपविभागीय अधिकारी (महसूल) चंद्रकांत बोरकर, तहसीलदार शिवराज पडोळे, नरेश मोटघरे, हरीश जैन, एकनाथ मदनकर, बेनिराम तिघरे, सुखदेव मडके, सुनीता पाराशर, मंदा पंचवटे, अनिल वानखेडे, अमोल राऊत, माणिक डोंगरे, नामदेव पिकलमुंडे, किसन गोरले, माणिक वडे, शिवशंकर नारनवरे, संजय डोंगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)