संत्र्याला मिळावा राजाश्रय
By Admin | Updated: December 4, 2015 03:08 IST2015-12-04T03:08:18+5:302015-12-04T03:08:18+5:30
नागपूर जिल्हा हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र संत्र्याला कवडीमोल भाव असल्याने संत्रा बाजारात विकण्याऐवजी शेतकरी तो रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र आहे.

संत्र्याला मिळावा राजाश्रय
शेतकऱ्यांच्या बैलबंडी मोर्चाने वेधले लक्ष : संत्रा व कापसाला योग्य भाव द्या
नागपूर : नागपूर जिल्हा हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र संत्र्याला कवडीमोल भाव असल्याने संत्रा बाजारात विकण्याऐवजी शेतकरी तो रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र आहे. सोबतच सोयाबीनचे उत्पादन घटले आणि कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नरखेड व काटोल तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी बैलबंडी मोर्चा काढला. तब्बल १२५ किमी बैलबंडी व पायी चालत ते गुरुवारी नागपुरात पोहोचले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने सायंकाळी रविभवनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सचिवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करीत मोर्चाचा समारोप केला.
काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा उत्पादकांसाठी काटोलमधील बंद पडलेला संत्रा कारखाना सुरू करावा, किंवा शेतकऱ्यांनाच चालवायला द्यावा, सर्वंकष पीक योजना सर्व पिकांसाठी लागू करावी, नुकसान भरपाईसह नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, कापसाला ६,५०० रुपये प्रति क्ंिवटल भाव जाहीर करावा. ग्रामीण भागात २४ तास ३ फेज वीज द्यावी, गाव तिथे तलाव ही योजना राबवावी, शेत तिथे रस्ता कार्यक्रम राबवावा, ग्रामीण भागात इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात आणि शालेय पोषण आहारात संत्री व इतर फळांचा समावेश करावा, आदी मागण्यांसाठी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता काटोल तालुक्यातील खंडाळा या गावाहून अॅड. नीलेश हेलोंडे यांच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. नरखेड, मोवाड, जलालखेडा, भारसिंगी, पारडसिंगा, काटोल, कोहळी, कळमेश्वर, ब्राह्मणी आदी मोठ्या गावांना भेटी देत हा मोर्चा नागपुरात दाखल झाला. दरम्यान प्रत्येक गावात मोर्चाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांसाठी भेटवस्तू म्हणून संत्रा, कापूस देण्यात आले.
गुरुवारी मोर्चा नागपुरात पोहोचला. मोर्चेकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचे होते. परंतु ते शहरात नव्हते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी मोर्चेकरी रविभवनातील त्यांच्या कॉटेजवर आले. ते ही नागपुरात नव्हते. तेव्हा पालकमंत्र्यांचे सचिवांना मोर्चेकऱ्यांनी मागणीचे निवेदन अणि शेतकऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तू सोपविल्या. सचिव पोटे यांनी निवेदन आणि वस्तू मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहाचवण्याचे आवासन दिले.
शिष्टमंडळात बैलबंडी मोर्चाचे संयोजक अॅड. नीलेश हेलोंडे यांच्यासह शेखर खरपुरीया, संदीप पवार, मनीष हेलोंडे, अमिताभ पावडे, तेजस केणे, विजय इवनाते आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)