गिट्टी मिळेना, बांधकामे रखडली

By Admin | Updated: November 25, 2015 07:07 IST2015-11-25T07:07:17+5:302015-11-25T07:07:17+5:30

गिट्टीवर आकारण्यात येणारी रॉयल्टी दुप्पट केल्याच्या विरोधात क्रशर मालकांनी गेल्या १० दिवसांपासून संप

Get the ballast, the construction works | गिट्टी मिळेना, बांधकामे रखडली

गिट्टी मिळेना, बांधकामे रखडली

क्रशर मालकांचा संप : दर प्रति ट्रक ७ हजारावर पोहचले
नागपूर : गिट्टीवर आकारण्यात येणारी रॉयल्टी दुप्पट केल्याच्या विरोधात क्रशर मालकांनी गेल्या १० दिवसांपासून संप पुकारला आहे. खाणीतून गिट्टी बाहेर पडणे बंद झाले आहे. नेमका याचा फायदा हार्डवेअर चालक व बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सने घेण्यास सुरुवात केली आहे. साठवून ठेवलेली गिट्टी ट्रकमागे दोन हजार रुपये जास्त आकारून विकल्या जात आहे. मात्र, हा साठादेखील पुढील दोन-तीन दिवसात संपणार असून त्यानंतर बांधकामे बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात गिट्टीवर २०० रुपये प्रति बास रॉयल्टी आकारण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने ११ मे २०१५ रोजी गौण खनिजावरील रॉयल्टी दुप्पट केली.
आता प्रती ब्रास ४०० रुपये रॉयल्टी आकारल्या जात आहे. याशिवाय महसूल विभागाने नुकतेत मुंबई येथे सचिवस्तरीय बैठक घेत खनिज विकास निधीच्या रूपात रॉयल्टीवर ३३ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणीही लवकरच केली जाणार आहे. या विरोधात आॅरेंज सिटी स्टोन क्रशर ओनर्स असोसिएशन, नागपूर ने १५ नोव्हेंबरपासून संप पुकारला असून खाणीतून गिट्टी काढणे बंद केले आहे. ही करवाढ क्रशर मालकांवर लादण्यात येणार असली तरी याचा परिणाम घर बांधण्यासाठी गिट्टी खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांवरच होणार आहे.
क्रशरच्या संपामुळे हार्डवेअर दुकानांना होणारा गिट्टीचा पुरवठा गेल्या १० दिवसांपासून बंद झाला आहे. काही हार्डवेअर दुकानदार व बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सकडे काही प्रमाणात गिट्टीचा साठा आहे. याचा फायदा ते उचलत आहेत. पूर्वी २०० फूट गिट्टी भरलेला ट्रक ५ हजार ते ५२०० रुपयांमध्ये मिळायचा. आता त्याच गिट्टीसाठी किमान ७ हजार रुपये आकारले जात आहे. लोकमत प्रतिनिधीने याची खातरजमा करण्यासाठी काही हार्डवेअर दुकानांना भेट देऊन एक ट्रक गिट्टी खरेदी करायची असल्याचे सांगितले. यावर हार्डवेअर दुकानदारांनी क्रशर मालकांचा संप असल्याचे सांगत संप मिटेपर्यंत गिट्टी मिळणे कठीण असल्याचे सांगितले. काहींना संपामुळे मध्य प्रदेशातून गिट्टी आणावी लागत असल्याचे कारण देत त्यामुळे वाढीव दर द्यावे लागतील, असे सांगितले. तर काहींनी आपल्याकडे तीन-चार ट्रक गिट्टीचा साठा असल्याचे सांगत त्यातून गिट्टी देण्याची तयारी दर्शविली.
मात्र, त्यासाठी प्रति ट्रक ७ हजार रुपये द्यावे लागले, असे स्पष्टपणे सांगितले. बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, क्रशरच्या संपामुळे गिट्टीचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे दरही वाढले आहेत.

गिट्टीचा साठा संपला
पूर्वी मोठे बिल्डर चार ते पाच ट्रक गिट्टीचा साठा करून ठेवायचे. मात्र, बांधकाम क्षेत्रात मंदी सुरू असल्यामुळे मोठे बिल्डरही गिट्टीत पैसे गुंतवून न ठेवता गरज भासेल तेव्हाच गिट्टी खरेदी करतात. त्यामुळे मोठ्या बिल्डरकडेही गिट्टीचा साठा उपलब्ध नाही. ज्यांच्याकडे साठा होता तोही आता संपला आहे. क्रशर मालकांचा संप पुढे काही दिवस सुरू राहिला तर शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेली सर्वच लहान, मोठी बांधकामे बंद पडतील. बहुतांश बिल्डर्सने कर्ज घेतले आहे. बांधकामे काही दिवस बंद राहिली तर बिल्डर्सवर व्याजाचा भुर्दंड बसेल. शिवाय बांधकाम मजुरांचीही उपासमार होण्याचा धोका आहे.
- सुंदर रतन,
अध्यक्ष, नागपूर ग्रामीण बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स असोसिएशन

Web Title: Get the ballast, the construction works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.