लिटीलनंतर जेंटिलची गुंडागर्दी
By Admin | Updated: May 3, 2015 02:15 IST2015-05-03T02:15:57+5:302015-05-03T02:15:57+5:30
पाटणकर चौकातील गोळीबाराचा आरोपी लिटील सरदारचा भाऊ जेंटिल सरदारने आपल्या साथीदारासोबत बुद्धनगर येथील एका घरावर हल्ला केला.

लिटीलनंतर जेंटिलची गुंडागर्दी
नागपूर : पाटणकर चौकातील गोळीबाराचा आरोपी लिटील सरदारचा भाऊ जेंटिल सरदारने आपल्या साथीदारासोबत बुद्धनगर येथील एका घरावर हल्ला केला. यात एक तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. सौरभ मनोज बावनगडे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या उपचार सुरू आहेत.
जेंटिल सरदार (बुद्धनगर), इत्ते खान (टेकानाका), प्रणय पाटील, पंकज आणि टुंबा अशी आरोपीची नावे आहेत. परिसरातील नागरिक जेंटिलच्या गुंडागर्दीमुळे दहशतीत आहेत. सूत्रानुसार बावनगडे कुटुंबातर्फे मागील दोन वर्षांपासून संदलचे आयोजन करीत आहे. ३० एप्रिल रोजी बावनगडे कुटुंबाने घराच्या समोर कार्यक्रमासाठी मंडप टाकला. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांना थोड्या दूर अंतरावर काही लोक एका झाडाखाली जुगार खेळतांना दिसले. सौरभ बावनगडे हा आपल्या मित्रांसोबत झाडाजवळ गेला. त्याला जेंटिल, प्रणय, इत्ते आणि टुंबा जुगार खेळतांना दिसले. त्याने धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याने येथे जुगार खेळण्या मनाई केली. त्यामुळे जेंटिलला राग आला त्याने त्याला शिवीगाळ करीत खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सौरभ गुपचूप निघून गेला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सौरभ, त्याचा भाऊ अंशुल, अनिकेत सहारे, सत्यम आदी घरासमोर संदलवाल्यांना शिल्लक रक्कम देण्यासाठी उभे होते. दरम्यान रात्री १२ वाजताच्या सुमारास जेंटिल आणि इतर आरोपी तलवार, चाकू आणि दंडे घेऊन आले. त्यांनी सौरभला धमकावत मारहाण केली. चाकूने सौरभच्या हातावर वार केले. सौरभला वाचवण्यासाठी धावलेल्या आईला व भावालाही वीट फेकून मारली. पाचपावली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)