मिथुनच्या रोड शोला परवानगी नाकारली, कार्यकर्ते संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:02+5:302021-04-09T04:08:02+5:30
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याच्या मतदानाअगोदर वातावरण तापले आहे. भाजपमध्ये प्रवेश घेतलेले सिने अभिनेते मिथुन चक्रवर्ती ...

मिथुनच्या रोड शोला परवानगी नाकारली, कार्यकर्ते संतप्त
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याच्या मतदानाअगोदर वातावरण तापले आहे. भाजपमध्ये प्रवेश घेतलेले सिने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या रोड शोला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.
बेहाला पश्चिम मतदारसंघातील भाजप उमेदवार सरबंती चॅटर्जी यांच्या प्रचारासाठी चक्रवर्ती यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासनाने ऐनवेळी परवानगी नाकारली. कुठलेही कारण न देता परवानगी नाकारल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. मिथूनदांनीदेखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या कृत्यांतून तृणमूल आम्हाला थांबवू शकत नाही. सत्ता हातातून जात असल्याचे दिसत असल्याने तृणमूलचे नेते अस्वस्थ झाले आहेत, असे मिथून चक्रवर्ती म्हणाले. त्यांच्या गृहसंपर्क प्रचारालादेखील परवानगी नाकारली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. तृणमूलच्या नेत्यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. भाजपच्या उमेदवाराकडून जाणुनबुजून ड्रामा केल्या जात असल्याची भूमिका तृणमूलतर्फे मांडण्यात आली.
.