‘एलजीबीटी’च्या मानवाधिकारासाठी लढणार ‘गौरव’
By Admin | Updated: June 12, 2017 02:25 IST2017-06-12T02:25:00+5:302017-06-12T02:25:00+5:30
आपला देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेगाने प्रगती करतोय. आधुनिक आणि उदात्त विचारसरणीही आता जनमानसात रुजायला लागली आहे.

‘एलजीबीटी’च्या मानवाधिकारासाठी लढणार ‘गौरव’
व्हीव्ह पॉझिटिव्ह अॅक्शनचा पुढाकार : मुंबई, नागपूर व औरंगाबाद कार्यक्षेत्र
आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपला देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेगाने प्रगती करतोय. आधुनिक आणि उदात्त विचारसरणीही आता जनमानसात रुजायला लागली आहे. परंतु प्रगतीच्या या पर्वातही लेस्बियन, गे, बीसेक्सुअल आणि ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) (एलजीबीटी) हे शब्द मात्र सर्वसामान्यांना खटकतात, किंबहुना अनेकदा ते हेटाळणीचाच विषय ठरतात. परंतु ही सुद्धा माणसे आहेत, त्यांनाही मन, भावना आहेत याचा कुणी विचारच करीत नाही. त्यामुळे अशा वर्गाच्या मूलभूत अधिकारासाठी लढायला या वर्गातीलच लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘गौरव’ या संस्थेने पुढाकार घेतला असून मुंबई, नागपूर व औरंगाबाद या क्षेत्रात संस्थेचे कार्यही सुरू झाले आहे.
‘गौरव’ ही एलजीबीटी समूहाच्या व्यक्तींनी पुढकार घेऊन समूहासाठी बनवलेली ही संस्था आहे. या संस्थेतर्फे विविध कार्य केले जातात. यात प्रामुख्याने एड्स जनजागृती, मानवाधिकार, एलजीबीटीबाबत माहिती देणे आदी कार्य करते. यासंदर्भात प्रशिक्षणाचेही कार्य केले जाते. एलजीबीटी समूह आपल्या अधिकारासाठी अनेक वर्षांपासून लढत आहेत. परंतु आपल्या देशात त्याचे स्वरूप फार व्यापक नाही. अलीकडील काही वर्षात हा समूह उघडपणे पुढे आला आहे. ते आता आपल्या लैंगिक समस्या व अधिकारांवर बोलू लागले आहेत. काही एनजीओतर्फे त्यांना योग्य प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.
अशीच एक संघटना म्हणजे व्हीव्ह पॉझिटिव्ह अॅक्शन ही संघटना होय. ही संघटना आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना मदत करते. या संस्थेने आता पहिल्यांदाच एलजीबीटी समूहाच्या मानवाधिकारांसाठी काम करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी गौरव या संस्थेवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी हा कार्यक्रम आहे.
या दोन वर्षात मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथील एलजीबीटी समूहातील लोकांमध्ये मानवाधिकाराबाबत जनजागृती करणे, लैंगिक समस्यांसह त्यांना कायद्याची माहिती देणे, न्यायालयीन क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करणे, प्रशिक्षण कार्यक्रम घेणे आदी कार्य केले जातील. एकूणच समाजापासून दुरावलेल्या या समूहालाही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून त्यांच्या मानवाधिकाराचे रक्षण केले जाणार आहे.
एलजीबीटी समूहाच्या मानवाधिकारासह आरोग्यबाबतही आम्हाला जनजागृती करावयाची आहे. मुंबई, नागपूर व औरंगाबाद हे आमचे कार्यक्षेत्र आहे. आम्हाला केवळ एलजीबीटी समूहासाठीच काम करायचे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील संख्याही निश्चित झाली आहे. मुंबईत २२०० , नागपुरात ११०० आणि औरंगाबाद येथे हजार लोकांसाठीच आम्हाला काम करायचे आहे.
- अमित, प्रोजेक्ट मॅनेजर, गौरव