गौरव एका तपस्वीचा...
By Admin | Updated: January 25, 2015 00:52 IST2015-01-25T00:52:36+5:302015-01-25T00:52:36+5:30
डॉ. जी.एम. टावरी वेल्लोर सोडून आल्यामुळे वेल्लोरचे नुकसान झाले आणि मध्य भारताचा फायदा झाला. जी.एम. टावरी सरांची जीवनशैली अतिशय साधी असून ते ज्ञानाचा सागर आहेत,

गौरव एका तपस्वीचा...
तामिळनाडूतील माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले गुरुऋण
नागपूर : डॉ. जी.एम. टावरी वेल्लोर सोडून आल्यामुळे वेल्लोरचे नुकसान झाले आणि मध्य भारताचा फायदा झाला. जी.एम. टावरी सरांची जीवनशैली अतिशय साधी असून ते ज्ञानाचा सागर आहेत, असे विचार टावरी यांच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त करून गुरुप्रति आपले ऋण व्यक्त केले.
बजाजनगरच्या सीम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. जी.एम. टावरी यांचा तामिळनाडूतील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरच्या माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला. डॉ. टावरींनी वेल्लोरच्या कॉलेजमध्ये न्यूरोलॉजी शिकविलेले विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. समारंभात व्यासपीठावर सीम्सचे उपसंचालक डॉ. लोकेंद्र सिंग, बेंगळुरुच्या साखरा हॉस्पिटलचे प्रोफेसर डॉ. चंद्रण नानामुथु, वॅनलेस हॉस्पिटल मिरजचे संचालक डॉ. नाथानियल सासे, ख्रिश्चन मेडिलकल कॉलेज वेल्लोरचे प्रोफेसर डॉ. मॅथ्यु अलेक्झांडर, सीम्सचे सचिव ओ. पी. जेजानी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. लोकेंद्र सिंग म्हणाले, सीम्स हॉस्पिटलच्या विकासासाठी डॉ. टावरी सदैव तत्पर राहिले. रिसर्च इन्स्टिट्यूट उभी करण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. अनेकांकडून मिळालेल्या दानाच्या रकमेतून सीम्स हॉस्पिटल उभे झाले आहे. डॉ. चंद्रण नानामुथु यांनी डॉ. टावरींची जीवनशैली साधारण असली तरी त्यांच्यात ज्ञानाचा सागर भरलेला असल्याचे सांगितले.
डॉ. मॅथ्यु अलेक्झांडर म्हणाले, नागपूरमध्ये स्पेशालिटी इन्स्टिट्यूट तयार करण्यात टावरींची भूमिका महत्त्वाची आहे. डॉ. नाथानियल सासे यांनी हॉस्पिटलसोबत रिसर्च इन्स्टिट्यूट विकसित करण्यात टावरींनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. जी.एम. टावरी यांनी व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे इन्स्टिट्यूट उभी करू शकल्याचे सांगून सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले. संचालन श्रद्धा भुल्लुर यांनी केले. कार्यक्रमाला सीम्स हॉस्पिटलचे व्यवस्थापन प्रतिनिधी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)