धम्मक्रांतीनंतर उघडले समानतेचे द्वार

By Admin | Updated: October 9, 2016 02:23 IST2016-10-09T02:23:57+5:302016-10-09T02:23:57+5:30

धम्मक्रांतीपूर्वी देशात मनुस्मृतीच्या विचारांचा पगडा समाजावर होता. या विचारात महिलांना दुय्यम स्थान दिले गेले.

Gateway opened after the revolution | धम्मक्रांतीनंतर उघडले समानतेचे द्वार

धम्मक्रांतीनंतर उघडले समानतेचे द्वार

 वर्षा गायकवाड : दीक्षाभूमीवर महिला परिषद
नागपूर : धम्मक्रांतीपूर्वी देशात मनुस्मृतीच्या विचारांचा पगडा समाजावर होता. या विचारात महिलांना दुय्यम स्थान दिले गेले. महिलांची सर्वाधिक कुचंबणा झाली व महिलांच्या विकासाचा मार्ग रोखला गेला होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केल्यानंतर खऱ्या अर्थाने समानतेचे आणि विकासाचे द्वार महिलांसाठी खुले झाले, असे प्रतिपादन माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. दीक्षाभूमीवर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती व डॉ. आंबेडकर महाविद्यालय महिला विकास मंच यांच्या संयुक्त विद्यामाने दीक्षाभूमीवर महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘धर्मांतरानंतर महिलांचा आर्थिक, सांस्कृतिक व धम्मविकास’ विषयावर वर्षा गायकवाड बोलत होत्या. डॉ. आंबेडकर राष्ट्रनिर्माता आहेत. त्यांनी संविधानाची रचना करून सर्वांना समान न्याय व अधिकार दिले. एवढेच नाही तर देशाला पुन्हा एकदा बुद्धाचा मानवतावादी, ज्ञानवादी, न्यायवादी धम्म दिला. याच आधारावर आज देशातील महिला प्रगतीचे शिखर गाठत असल्याचे मनोगत गायकवाड यांनी व्यक्त केले.
परिषदेच्या अध्यक्षा डॉ. कमलताई गवई यांनी मनोगत व्यक्त करताना, तथागत बुद्ध व महामानव डॉ. आंबेडकर यांनी समाजात महिला-पुरुष असा भेदाभेद न ठेवता समानतेचा अधिकार दिल्याचे मत व्यक्त केले. महिलांनी प्रगतीची उंची गाठली असून आता त्यांनी अबला म्हणून नाही तर सबला म्हणून जगावे, असे आवाहन त्यांनी केले. परिषदेतील प्रमुख वक्ता प्रा. सरोज आगलावे यांनी, बाबासाहेबांनी आम्हाला धम्माचा वारसा दिल्याचे सांगितले. त्यांनी धम्मच्रक्र प्रवर्तन केले आणि मनुस्मृती नष्ट करून महिलांना प्रथा परंपरांमधून मुक्त केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते थोर समाजशास्त्रज्ञ होते व त्यांनी समाजातील विषमता नष्ट करण्याचे शस्त्र दिल्याचे त्या म्हणाल्या. पुणे येथील उद्योजिका स्नेह लोंढे यांनी बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राविषयी ज्ञानावर व भूमिकेवर प्रकाश टाकला. आदिवासी विकास विभाग नागपूरच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
परिषदेला राष्ट्रीय दलित मानव अधिकार अभियान, नवी दिल्लीच्या राज्य समन्वयक रमा पांचाळ, औरंगाबाद विद्यापीठाच्या पाली विभागप्रमुख डॉ. सुशीला मूल जाधव, डॉ. प्रतिभा अहिरे, रेखाताई खोब्रागडे आदींनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. सी. पवार, प्रा. बी.ए. मेहरे आदी प्रामुख्याने उपस्थित होेते. वंदना जीवने यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)

धम्मदीक्षा सोहळा आज
दीक्षाभूमीवर आयोजित ६० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने रविवारी धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात शेकडोंना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात येईल.

Web Title: Gateway opened after the revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.