सराफांची काळी गुढी
By Admin | Updated: April 8, 2016 02:37 IST2016-04-08T02:37:32+5:302016-04-08T02:37:32+5:30
सन १९६२ नंतर पहिल्यांदा गुढीपाडव्याला सराफांची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे यंदा १०० कोटींचा व्यवसाय ठप्प होईल,

सराफांची काळी गुढी
१०० कोटींचा व्यवसाय बुडणार :
५४ वर्षांनंतर दुकाने पहिल्यांदा बंद राहणार
मोरेश्वर मानापुरे नागपूर
सन १९६२ नंतर पहिल्यांदा गुढीपाडव्याला सराफांची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे यंदा १०० कोटींचा व्यवसाय ठप्प होईल, शिवाय काळी गुढी उभारून सराफा व्यापारी केंद्र सरकारच्या अबकारी कर आकारणीचा निषेध करणार आहे.
ग्राहक मुहूर्ताच्या खरेदीला मुकणार
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारपेठांमध्ये उत्साह असतो. काही ग्रॅम सोने खरेदीचा प्रत्येकाचा अट्टाहास असतो. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरूमची सजावट करण्यात येते. पण यंदा गुढीपाडव्याला अबकारी कराच्या विरोधात सराफांनी पुकारलेल्या बंद आंदोलनामुळे नागपुरातील ३५०० पेक्षा जास्त दुकाने आणि मोठ्या सराफांसह नामांकित कंपन्यांची जवळपास २० शोरूम बंद राहतील.
आंदोलन सुरूच राहील
नागपूर : बंदमुळे ग्राहकांची गैरसोय होणार असून मुहूर्ताच्या खरेदीला ते मुकतील. सराफा व्यापारी शुक्रवारी गुढीपाडव्याला काळी गुढी उभारणार आहे. केंद्र सरकारच्या अबकारी कर आकारणीचा निषेध करणार आहे. सराफांनी नेहमीच सरकारच्या ध्येयधोरणाचा स्वीकार केला आहे. या कराला आमचा विरोध नाही. कारण हा कर आम्ही ग्राहकांकडूनच वसूल करू. पण त्यातील जाचक अटी आमचा व्यवसाय संपुष्टात आणणाऱ्या आहेत. त्या अटींना आमचा विरोध आहे. कर पूर्णत: रद्द होईपर्यंत बंद आंदोलन सुरूच राहील, असे रोकडे यांनी स्पष्ट केले.
दुकान उघडणाऱ्यांवर दंड
व्यापाऱ्यांचे बंद आंदोलन आता तीव्र झाले आहे. कोणताही सराफा व्यापारी गुढीपाडव्याला दुकान उघडणार नाही. पण जो दुकानदार गुढीपाडव्याला दुकान उघडेल, त्यांच्याकडून ११ हजार रुपये दंड स्वरूपात आकारण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शहरात विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आपापल्या भागात दुकाने बंद आहेत की नाही, याची शहानिशा करीत आहेत. शटर बंद करून आत काम सुरू असेल तर त्यांना काम बंद करण्यास बाध्य करीत आहेत. सराफा व्यापाऱ्यांमध्ये एकजूटता असावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. व्यापाऱ्यांची एकजूटता राहावी म्हणून गुढीपाडव्याला काळी गुढी उभारून निषेध करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)