गार्गी चोपरा यांचा राजीनामा अद्याप मंजूर नाही
By Admin | Updated: March 5, 2017 02:13 IST2017-03-05T02:13:57+5:302017-03-05T02:13:57+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून चार हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी चोपरा यांनी

गार्गी चोपरा यांचा राजीनामा अद्याप मंजूर नाही
नागपूर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून चार हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी चोपरा यांनी काँग्रेसमधील गटबाजी व मतभेदामुळे नगरसेवकपदाचा राजीनामा टपालाव्दारे महापालिका आयुक्तांकडे पाठविला आहे. परंतु या राजीनाम्याची खातरजमा केल्यानंतरच मंजूर क रावा लागणार आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यत हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नव्हता.
टपालाद्वारे पाठविलेला राजीनामा चोपरा यांनीच पाठविला आहे की अन्य कुणी पाठविला. याची शहानिशा प्रशासनाला करावी लागणार आहे. राजीनामा चोपरा यांनीच पाठविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो मंजूर केला जाईल, अशी माहिती महापालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली.
पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक यावेळी चांगलीच गाजली होती. भाजपाने शक्ती पणाला लावल्यानंरही या प्रभाग क्रमांक १० मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झालेत. त्यात गार्गी चोपरा सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या. त्या माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपरा यांच्या पत्नी होत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. (प्रतिनिधी)
काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी चोपरा यांनी पक्षातील अंतर्गत वादातून राजीनामा दिलेला नाही. यामागे वैयक्तिक कारण असावे. त्या शनिवारी काँग्रेस निरीक्षकांच्या बैठकीला उपस्थित नव्हत्या. परंतु त्यांची समजूत काढण्यात आली आहे. त्या राजीनामा देणार नाही.
- विकास ठाकरे, अध्यक्ष शहर काँग्रेस