शहरात कचऱ्याचे ढिगारे

By Admin | Updated: January 26, 2016 03:36 IST2016-01-26T03:36:11+5:302016-01-26T03:36:11+5:30

कचरा संकलन व वाहून नेणाऱ्या वाहनांच्या चालकांनी वेतनवाढीसाठी रविवारपासून संप पुकारला आहे. यावर अद्याप

Garbage debris in the city | शहरात कचऱ्याचे ढिगारे

शहरात कचऱ्याचे ढिगारे

नागपूर : कचरा संकलन व वाहून नेणाऱ्या वाहनांच्या चालकांनी वेतनवाढीसाठी रविवारपासून संप पुकारला आहे. यावर अद्याप तोडगा न निघाल्याने सोमवारी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत होते.
शहरातील कचरा संकलन व वाहून नेण्याची जबाबदारी कनक रिसोर्सेस कंपनीकडे आहे. यासाठी २५० वाहने आहेत. यातील ४० टक्के वाहन चालक संपावरआहेत. त्यामुळे दोन पाळीत कचरा उचलण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कनक व्यवस्थापनाला दिले आहे.
संपाचा परिणाम प्रामुख्याने सतरंजीपुरा व मंगळवारी झोन भागात पडला आहे. परंतु मंगळवारपर्यंत यावर तोडगा निघेल, असा विश्वास हर्डीकर यांनी व्यक्त केला. कचरा संकलन न केल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पोलिसांना कल्पना दिल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. ज्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे त्या संघटनेकडून महापालिका प्रशासन अथवा महापौर कार्यालयाला कोणत्याही स्वरूपाची सूचना मिळालेली नाही. हा संप नियमबाह्य असल्याने संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दटके यांनी दिली.
कचरा उचलण्याची जबाबदारी कनक यांच्याकडे आहे. परंतु कचरा गोळा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे कनकने महापालिकेची मदत मागितली आहे. महापालिका चालक व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करणार आहे. या मोबदल्यात कंपनीकडून शुल्क वसूल करण्यात येईल. एलबीटीमुळे कंपनीचे आॅगस्ट महिन्यापासून बिल प्रलंबित आहे. परंतु आता नियमित देण्यात येते, अशी माहिती हर्डीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

अर्धाच कचरा उचलला
शहरातून दररोज ११०० टन कचरा वाहनांच्या ३०० फेऱ्यांद्वारे संकलित केला जातो. परंतु रविवारी केवळ ७४ फेऱ्या झाल्या. सोमवारी यात थोडी सुधारणा झाली. परंतु दोन पाळीत कचरा उचलण्याचे निर्देश दिल्याने ही समस्या कमी होईल, असे हर्डीकर यांनी सांगितले.
नंदनवन पोलिसात गुन्हा दाखल
वाहनचालकांनी रविवारी अचानक संप पुकारल्याने सात वाहनचालकांना कमी करण्यात आले आहे. तसेच रविवारी प्रतापनगर, सक्करदरा व पाचपावली येथे प्रत्येकी एका कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सोमवारी नंदनवन पोलिसात एका कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची मदत मागितल्याची माहिती कनक रिसोर्सेसचे प्रमुख कमलेश शर्मा यांनी दिली.

Web Title: Garbage debris in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.