Gandhi is not complete without Ambedkar; Jabbar Patel | आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होत नाही; जब्बार पटेल
आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होत नाही; जब्बार पटेल

ठळक मुद्दे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाचे चर्चेतून उलगडले पैलू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधी विरुद्ध आंबेडकर असा विचारप्रवाह समाजात आहे. पण खऱ्या अर्थाने आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होऊच शकत नाही. कारण त्यांच्या विचारांचे प्रवाह वेगळे असले तरी, त्यांचा उद्देश मात्र देशहिताचा आहे. असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टीमच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपट महोत्सवात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या डॉ. आंबेडकर या चित्रपटावर चर्चा करताना ते बोलत होते. या चित्रपटाच्या संदर्भात डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी जब्बार पटेल यांची मुलाखत घेतली. या चित्रपटाबद्दल बोलताना जब्बार पटेल म्हणाले की, या सिनेमामुळे मला लोकांनी उचलून धरले. गावपातळीवरून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविले. त्यांनी चित्रपटासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. अभिनेते ममुट्टी यांनी बाबासाहेब कसे साकारले याबद्दल त्यांनी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी या चित्रपटाला महाकाव्य म्हणून संबोधले असल्याचे पटेल म्हणाले. या सिनेमासाठी हजारो लोकांनी एक कप चहा व वडा पाव खाऊन अभिनय केल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या नावावर कोलंबिया विद्यापीठाचा परिसर नि:शुल्क शुटींगसाठी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सभागृहात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांनी चित्रपटाच्या अनेक बारकाव्यासंदर्भात जब्बार पटेल यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Gandhi is not complete without Ambedkar; Jabbar Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.