गांधीसागर बळींनी कासावीस

By Admin | Updated: July 8, 2014 01:15 IST2014-07-08T01:15:26+5:302014-07-08T01:15:26+5:30

गुन्हेगारी प्रवृत्तींपासून समाजाचे रक्षण व्हावे यासाठी तब्बल ६२ वर्षांपासून अविरतपणे झटत असलेले गणेशपेठ पोलीस ठाणे हल्ली गांधीसागर बळींनी कासावीस झालेले आहे.

Gandasagar sacrificed Kasavis | गांधीसागर बळींनी कासावीस

गांधीसागर बळींनी कासावीस

राहुल अवसरे - नागपूर
गुन्हेगारी प्रवृत्तींपासून समाजाचे रक्षण व्हावे यासाठी तब्बल ६२ वर्षांपासून अविरतपणे झटत असलेले गणेशपेठ पोलीस ठाणे हल्ली गांधीसागर बळींनी कासावीस झालेले आहे.
मृत्युपूर्व जबाबाचा कायदा
शहराच्या हृदयस्थानी असलेल्या या पोलीस ठाण्याचा इतिहास काहीसा रोचक आहे. ९ मे १९५२ रोजी पोलीस उपमहानिरीक्षक खान यांनी या पोलीस ठाण्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर या ठाण्याने अनेक चढउतार पाहिले. खास वैशिष्ट्य म्हणजे या ठाण्यातील एका प्रकरणाने संपूर्ण देशाला ‘मृत्यूपूर्व जबाबा’चा कायदा दिला. हे प्रकरण असे की, एम्प्रेस मिल आणि मॉडेल मिल कामगारांकडून खंडणी वसुलीवरून खुशाल, तुकाराम, संपत आणि टोळीच्या तंटू, इनायतउल्ला ऊर्फ कालिया, बाबूलाल यांच्या टोळीसोबत चकमकी होत होत्या. बजेरिया भागात १२ फेब्रुवारी १९५६ रोजी खुशालदादा खोब्रागडे पहेलवान आणि साथीदारांनी बाबूलाल पहेलवानाचा खून केला होता. बाबूलालने मरताना घडलेली घटना सांगितली होती. त्या आधारावर खुशालदादाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत फाशीची शिक्षा झाली होती. त्याने राष्ट्रपतींकडे केलेली दयायाचिका मंजूर होऊन फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तीत झाली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन ठाणेदार ए. ए. खान यांनी केला होता.
कमी मनुष्यबळ
अतिवर्दळीचा भाग म्हणून या पोलीस ठाण्याचा समावेश होतो. तरीही ठाण्यातील मनुष्य बळाचे प्रमाण अडीच हजार लोकसंख्येमागे एक कर्मचारी असे आहे. सध्या एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक दुय्यम पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक पाच पोलीस उपनिरीक्षक, चार सहायक पोलीस उपनिरीक्षक, १६ हेड कॉन्स्टेबल, ४९ कॉन्स्टेबल, दोन महिला हेड कॉन्स्टेबल, १६ महिला पोलीस कॉन्स्टेबल आहेत. एकूणच १० अधिकारी ९३ कर्मचारी आहेत. प्रत्यक्ष मंजुरी १० अधिकारी आणि १७५ कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे ८१ कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे.
चोऱ्यांचे प्रमाण अधिक
मध्यवर्ती बसस्थानक आणि कॉटनमार्केट, अशी अतिवर्दळीची ठिकाणे असल्याने या भागात चोऱ्या, वाहनचोऱ्यांचे आणि मोबाईल फोन पळविण्याचे प्रमाण अधिक आहे. या ठाण्याचा गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीचा आलेखही वाढता आहे. २०११ मध्ये २३८, २०१२ मध्ये २४९ आणि २०१३ मध्ये २५४ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत १३३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.
मन सुन्न करणारे मृत्यू
दर दोन-तीन दिवसाआड एक तरी मृतदेह गांधीसागर तलावात तरंगताना आढळतो. बहुतांश जीवनाला कंटाळूनच आत्महत्या करतात. हे मृतदेह पाहूनच मन सुन्न होते. दरवर्षी सरासरी ७० ते ८० मृतदेह एकट्या गांधीसागर तलावात आढळतात. येथील आत्महत्यांना रोख लागेल की नाही, असा एकच प्रश्न उपस्थित केला जातो. २०१३ मध्ये १३० जणांचा अनैसर्गिक मृत्यू झाला. चालू वर्षी आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ७० ते ८० % मृत्यू या तलावातील आहे.

Web Title: Gandasagar sacrificed Kasavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.