कोरोना लॉकडाऊनच्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:17+5:302021-04-05T04:07:17+5:30
नागपूर : कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये या सत्रात पहिली ते आठवीमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

कोरोना लॉकडाऊनच्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ
नागपूर : कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये या सत्रात पहिली ते आठवीमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वांनाच पास झाल्याचा आनंद असला तरी प्रत्यक्षात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मात्र खेळच झाला आहे. या वर्षभरात आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची शाळाही भरली नाही, परीक्षाही झाली नाही, एवढेच नाही तर अनलॉक लर्निंगचे धडेही त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षिणक भवितव्य यंदा काळवंडलेलेच दिसत आहे.
नागपूर विभागात असलेल्या ९ प्रकल्पांत मिळून जवळपास ९२ हजार विद्यार्थी शाळा शिकत आहेत. पहिली ते दहावी या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या यातील बहुतेक मुलांच्या हाती गेल्या वर्षभरात पुस्तकच आले नाही. संपूर्ण वर्षभर कोरोना संक्रमणाची स्थिती कायम होती. यामुळे शाळाच भरल्या नाहीत.
या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य थांबू नये यासाठी अनलॉक लर्निंग प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी कार्यपुस्तिका आणि कृतीपुस्तिका छापण्याचा निर्णय नाशिक आयुक्तालयाने घेतला होता. मात्र, कोरोना संक्रमणामुळे अनेक शाळापर्यंत या पुस्तिका पोहोचल्याच नाही.
वस्ती, तांडे, पोड, पाड्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचून शिकविण्याचा आदेशही आदिवासी विकास आयुक्तालयातून निघाला होता. मात्र रस्ते, पाऊस,
गावात इंटरनेट सुविधा नसणे, ॲण्ड्रॉइड मोबाइल नसणे, मोबाइलला रेंज न मिळणे, शिक्षकांना गावात मुक्कामाची सोय नसणे आदी अनेक कारणांनी गेल्या सत्रात हे शिक्षणच रखडले.
...
पुस्तके मिळालीच नाही
अनुदानित आश्रमशाळांना गेल्या सत्रात पुस्तकेच मिळाली नाही. कोरोना प्रकोप कमी झाल्यावर १५ डिसेंबर-२०२० पासून नववी आणि दहावीचे वर्ग भरविणे सुरू झाले. त्यांतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्गही भरविण्यात आले. मात्र, जेमतम १० वीचेच वर्ग भरू शकले. शिक्षक आणि विद्यार्थी संक्रमित व्हायला लागल्याने पुन्हा शाळा बंद पडल्या. वर्षभर चालणाऱ्या सत्राचा ७५ टक्के अभ्यासक्रम नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना फक्त एक ते दीड महिन्यात शिक्षकांनी शिकविला. यावरून गुणवत्तेचा काय तो अंदाज लावता येईल.
...
नामांकित इंग्रजी माध्यमाच्या नागपूर विभागात ४५ शाळा आहेत. सुमारे १० हजार विद्यार्थी येथून शिकतात. मात्र, शाळा भरल्या नाही. वसतिगृहात विद्यार्थ्यांना ठेवून ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र अनेक पालकांनी मुलांना गावाकडे परत नेले.
...