नागपूर : कुंदनलाल गुप्तानगरात चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा घातला. यावेळी ८ जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात अटक केली.
गेल्या अनेक दिवसांपासून कुंदनलाल गुप्ता नगरातील खोब्रागडेच्या घराजवळ हा जुगार अड्डा सुरू होता. त्याची माहिती कळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगरचे पोलीस उपिनरीक्षक जितेंद्र भार्गव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रविवारी सायंकाळी ४.३० ला या जुगार अड्ड्यावर छापा घातला. यावेळी तेथे प्रभू गोविंदराव बावणे, चंद्रभान रामभाऊ कुंभारे, प्रवीण रामदास गोंडाणे, कोलबा शामराव भनारकर, गिरधारी पांडुरंग देवीकर, बबन चंद्रभान खोब्रागडे, प्रवीण निळकंठ पिंपळघरे आणि नरेंद्र रामभाऊजी कुंभारे हे सर्व ताशपत्त्यावर पैशाची हारजीत करताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर जुगार कायद्यानुसार कारवाई केली.
---
चोरटा जेरबंद, साहित्य जप्त
नागपूर : अब्दुल्ला नासिर खान (वय ३१) यांच्या टिप्परमधून विविध साहित्य चोरून नेणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. शुभम नवीनराव उके (वय २५) असे त्याचे नाव असून तो राणी दुर्गावती चौकात राहतो. ७ ऑगस्टला त्याने ही चोरी केली होती. यशोधरानगर पोलिसांनी त्याचा छडा लावून आरोपी उकेच्या मुसक्या बांधल्या.
---