गडकरी- राऊतांच्या समक्ष भाजप-काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST2021-07-04T04:06:27+5:302021-07-04T04:06:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरातील विकास कामे जवळपास ठप्पच आहेत. ...

गडकरी- राऊतांच्या समक्ष भाजप-काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरातील विकास कामे जवळपास ठप्पच आहेत. मोजकीच कामे सुरू असून, काही पूर्णत्वास गेली आहेत. त्यात पुढील वर्षात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. विकास कामाचे श्रेय घेण्यावरून राजकीय पक्षात चढाओढ सुरू झाली आहे. याचा प्रत्यय शनिवारी वांजरा येथील पिवळी नदीवरील पुलाच्या लोकार्पणप्रसंगी आला. शासकीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत भाजप व काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केले.
नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी नितीन राऊत होते. कार्यक्रमस्थळी भाजपचे झेंडे लावण्यात आले होते. व्यासपीठाच्या एका बाजूने भाजपने नितीन गडकरी यांचे होर्डिंग लावले होते, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने पालकमंत्री नितीन राऊत यांचे होर्डिंग लावले होते. कार्यक्रमस्थळी नितीन गडकरी पोहचताच भाजप कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. हा कार्यक्रम भाजपचाच असल्याचे स्वरूप आले होते. तर काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर नितीन राऊत यांची प्रतीक्षा करीत होते. त्यांचे आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. ढोलताशांच्या गजरात काँग्रेसचे झेंडे उंचावत ‘नितीन राऊत आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत कार्यकर्ते थेट कार्यक्रमस्थळी पोहचले. गर्दी व रेटारेटीमुळे येथे एकच गोंधळ उडाला. सुरक्षा जवानांची चांगलीच तारांबळ उडाली. गडकरी व राऊत यांनी फीत कापून लोकार्पण केले. भाषण न देता लगेच दोन्ही नेते पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.
राजकीय कार्यक्रमांना नियम नाही का?
- कोविडचा धोका अजूनही टळलेला नाही. संसर्गाचा धोका विचारात घेता, दुकाने व प्रतिष्ठाने दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याला मुभा आहे. लग्न समारंभात ५० लोकांना परवानगी आहे, तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांनाच परवानगी आहे. दुसरीकडे लोकार्पण कार्यक्रमात हजाराहून अधिक लोकांची गर्दी होती. सोशल डिस्टन्स कुठेही नव्हते. लोकार्पणप्रसंगी उभे राहायलाही जागा नव्हती, अशी परिस्थिती होती. व्यावसायिकांनी व सर्वसामान्यांनी नियम मोडले तर दंड मग राजकीय पक्षांना हा नियम लागू होत नाही का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
....
पिवळी नदीवरील पुलाचे लोकार्पण
केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत वांजरा येथे शनिवारी पिवळी नदीवरील पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत होते. हा १.२० किमी लांबीचा रस्ता असून, ५० मीटर लांबीचा पूल आहे. यावर २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, गिरीश व्यास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार डॉ. मिलिंद माने व मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मार्गदर्शन केले. पुलाच्या बांधकामामुळे पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीपासून मुक्ती मिळणार आहे. या भागातून शहराकडे जाणारे दळणवळण अधिक सोपे होईल आणि वेळेची बचत होणार असल्याचे वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.