विकासाच्या चर्चेसाठी गडकरी-चव्हाण एकत्र येणार
By Admin | Updated: November 21, 2014 00:51 IST2014-11-21T00:51:35+5:302014-11-21T00:51:35+5:30
विदर्भ आर्थिक विकास परिषदेने (वेद) आयोजित केलेल्या ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेंट’ या विषयावरील चर्चासत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका व्यासपीठावर

विकासाच्या चर्चेसाठी गडकरी-चव्हाण एकत्र येणार
वेदचे आयोजन : विकास धोरणावर चर्चासत्र
नागपूर : विदर्भ आर्थिक विकास परिषदेने (वेद) आयोजित केलेल्या ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेंट’ या विषयावरील चर्चासत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. गडकरी छोट्या राज्याचे पुरस्कर्ते आहेत तर चव्हाण हे मागास भागाच्या विकासावर अधिक भर देण्याची भूमिका मांडणारे आहेत. शिवाय विधानसभा निवडणूक काळात गडकरींनी चव्हाण यांच्यावर नेम साधला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एका व्यासपीठावर येऊन आपली बाजू कशी भक्कमपणे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वेदने रविवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन केले आहे.ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘द इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी होणार आहे.
चर्चासत्रात राजदीप सरदेसाई हे नियंत्रकाची भूमिका बजावतील. पारंपरिक राजकीय विचारधारा बाजूला सारून विकासाच्या मुद्यांवर राजकीय नेते एकत्र आले पाहिजे, अशी वेदची नेहमीचीच भूमिका आहे. जात, धर्म, क्षेत्र आणि भाषावाद बाजूला सारून मतदारांनी मतदान केले. विदर्भ विकासाच्या दृष्टीने लोकांच्या काय अपेक्षा आहेत, हे नेत्यांनी समजावून घ्यावे, असे वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख आणि सचिव राहुल उपगन्लावार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीत कलगीतुरा
विकासासाठी एकत्र
विधानसभा निवडणुकीत गडकरी- चव्हाण यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला होता. चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेशाची इच्छा आपल्याकडे व्यक्त केली होती, असा बॉम्ब गडकरींनी चव्हाण यांच्यावर टाकला होता. त्यावेळी चव्हाण यांनी देखील गेल्या दहा वर्षात आपण गडकरींना कधीच फोन केला नाही व खासगीत भेटलोही नाही, असा दावा करीत गडकरी यांनाच अरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी चव्हाण यांनी महाराष्ट्र व गुजरातच्या तुलनात्मक चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते. त्यावेळी भाजप नेत्यांनी चव्हाण यांना लक्ष्य केले होते. आता गडकरी व चव्हाण या दोन्ही नेत्यांना एकमेकांच्या समोर विकासाप्रती असलेला सवत:चा दृष्टीकोन मांडण्याची संधी आहे. या संधीचे दोन्ही नेते सोनं करतील व राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत, असा संदेश देतील अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.