गडकरींनी घेतली आणखी चार गावे दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:06 IST2021-01-01T04:06:28+5:302021-01-01T04:06:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील चार गावांची ...

गडकरींनी घेतली आणखी चार गावे दत्तक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील चार गावांची निवड केली. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून मात्र या योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही.
गावांचा विकास करण्यासाठी पाच वर्षापूर्वी केंद्र सरकारने सांसद आदर्श ग्राम योजना सुरू केली. शहरी भागातील मंत्री, खासदार यांनी प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील एका गावाची निवड करायची होती. गावात विकास कामे करण्यासाठी त्यांना खासदार निधीतील २५ लाख रुपये पर्यंतचा निधी देता येतो. विविध योजना एकत्रितपणे राबवून ग्राम आदर्श करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात किती विकास झाला, याचे मात्र मूल्यमापनच झाले नाही. गेल्या लोकसभेच्या वेळी नितीन गडकरी यांनी उमरेड तालुक्यातील पाचगाव दत्तक घेतले होते. येथे कोट्यवधींचा निधी विकास कामाकरिता देण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. यंदा त्यांनी चार गावांची निवड केली. यात मौदा तालुक्यातील निहारवाणी, कामठी तालुक्यातील गुमथळा, नागपूर ग्रामीण तालुक्यातील बोरखडी व कळमेश्वर तालुक्यातील वरोडा गावाचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. डॉ. विकास महात्मे यांनी पारशिवनी तालुक्यातील भागेमाहरी गावाची निवड केली आहे. रामटेक लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी गेल्या वेळी रिधोरा गावाची निवड केली होती. यंदा मात्र त्यांनी एकाही गावाची निवड केली नाही.