गाडगेबाबांचे स्मृतिवाहन नागपुरात
By Admin | Updated: November 11, 2016 03:07 IST2016-11-11T03:07:17+5:302016-11-11T03:07:17+5:30
स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीतून गावोगावी फिरून स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला,

गाडगेबाबांचे स्मृतिवाहन नागपुरात
राज्यभर स्वच्छतेचा संदेश देणार : ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा पुढाकार
नागपूर : स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीतून गावोगावी फिरून स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला, ते गाडगेबाबांचे स्मृतिवाहन शुक्रवारी नागपुरात दाखल होणार आहे. महाराष्ट्र शासनाने गाडगेबाबांच्या स्मृती जपण्यासाठी हे वाहन संग्रही ठेवले असून, २ आॅक्टोबरपासून शासनाने स्वच्छतेचा जागर गावागावात पोहचविण्यासाठी या वाहनाचे पालखीत रूपांतर करून, महाराष्ट्रभर भ्रमंती सुरू केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने २ आॅक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेचा संदेश महाराष्ट्रभर पोहचविण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी वापरलेल्या गाडीचा उपयोग केला आहे. संत गाडगेबाबा आज नसले तरी, त्यांनी आपल्या कीर्तनातून दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्र आजही तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. आज त्यांनी वापरलेल्या गाडीचाही महाराष्ट्र सरकार स्वच्छतेचा जागर करण्यासाठी उपयोग करीत आहे.
११ नोव्हेंबर रोजी गाडगेबाबांचे स्मृतिवाहन भंडारामार्गे नागपुरात पोहचणार आहे. प्रथम मौदा पंचायत समिती अंतर्गत महादुला येथे स्वच्छता पालखीचे स्वागत जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
बोरगाव वरून येणारे हे स्मृतिवाहन नागपूर येथे मुक्कामी राहणार आहे. १२ नोव्हेंबरला हिंगणा पंचायत समिती अंतर्गत कवडसमार्गे ग्रामपंचायत पेंढरी देवळी येथे पोहचणार आहे.
या दरम्यान गावात लोकसहभागातून स्वच्छता व पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत, पथनाट्य, गुरुदेव सेवा मंडळाचे व वारकरी मंडळाचे भजन होणार आहे. यात मोठ्या संख्येने ग्रामस्थांचा सहभाग राहणार आहे. नागपूरमार्गे हे स्मृतिवाहन वर्धेकडे रवाना होणार आहे.(प्रतिनिधी)