‘गडारिया’ व ‘गडरिया’ एकच जात
By Admin | Updated: July 7, 2014 00:58 IST2014-07-07T00:58:36+5:302014-07-07T00:58:36+5:30
एका विद्यार्थ्याच्या प्रकरणात ‘गडारिया’ व ‘गडरिया’ एकच जात असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ग्राह्य धरला आहे.

‘गडारिया’ व ‘गडरिया’ एकच जात
हायकोर्ट : भटक्या जमाती प्रवर्गात समावेश
नागपूर : एका विद्यार्थ्याच्या प्रकरणात ‘गडारिया’ व ‘गडरिया’ एकच जात असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ग्राह्य धरला आहे.
‘गडारिया’ ही धनगर समाजातील उपजात असून तिचा भटक्या जमाती प्रवर्गात समावेश होतो. टंकलिखाणातील चुकीमुळे इंग्रजी भाषेतील शासन निर्णयात ‘गडारिया’ तर, मराठी भाषेत ‘गडरिया’ असा उल्लेख करण्यात आला होता. परिणामी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नागपूर येथील ओंकार शिवकुमार पाली या विद्यार्थ्याचा ‘गडारिया’ भटक्या जमातीचा दावा फेटाळला होता. यामुळे ओंकारने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.
ओंकारकडे १९६१ पूर्वीची कागदपत्रे असून त्यात त्याच्या आजोबाची जात ‘गडारिया’ दाखविण्यात आली आहे.
शासनाने १८ आॅक्टोबर २०१३ रोजीच्या निर्णयात ‘गडारिया’ व ‘गडरिया’ या दोन्ही जाती एकच असल्याचा खुलासा करून त्यांचा धनगर समाजात समावेश केला आहे.
ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा वादग्रस्त आदेश रद्द केला. तसेच, याचिकाकर्त्याच्या भटक्या जमाती प्रवर्गातील ‘गडारिया’ जातीच्या दाव्यावर आठ दिवसांत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश समितीला दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रशांत गोडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)