कळमन्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:39+5:302021-04-05T04:07:39+5:30
नागपूर : कळमना कृषी उत्पन्न समितीच्या सर्व बाजारापेठांमध्ये कोरोना काळातही दररोज होणाऱ्या गर्दीच्या उच्चांकामुळे कोरोना रुग्ण वाढत आहे, शिवाय ...

कळमन्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
नागपूर : कळमना कृषी उत्पन्न समितीच्या सर्व बाजारापेठांमध्ये कोरोना काळातही दररोज होणाऱ्या गर्दीच्या उच्चांकामुळे कोरोना रुग्ण वाढत आहे, शिवाय रुग्ण संख्या आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने काहीही उपाययोजना केलेल्या नसून सुस्त प्रशासनाने कळमना मार्केट हॉटस्पॉट ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
भाजी बाजार, फळे बाजार, आलू-कांदे बाजार, धान्य बाजार, न्यू ग्रेन मार्केट, मिरची बाजार आदी बाजारात कोरोना नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचे सदर प्रतिनिधीने कळमना बाजाराची पाहणी केल्यानंतर दिसून आले. गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. येथील सर्वच अडतिये आणि विक्रेत्यांना कोरोनाची संसर्गाची भीती आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्याची मागणी सर्वच बाजारपेठांमधील अडतियांनी प्रशासनाकडे केली आहे. पण प्रशासनाचे मुख्य अधिकारी आणि अन्य अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसल्याचे अडतियांनी सांगितले.
अडतिया आणि विक्रेते म्हणाले, बाजारात येणारे किरकोळ विक्रेते, व्यापारी आणि लोकांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची विनंती करण्यात येते. पण ती धुडकावून लावत लोक खरेदीसाठी गर्दी करतात. त्यामुळे या सर्वच बाजारपेठांमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. बाजारात कळमना पोलीस स्टेशन आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने पोलिसांची मदत घेतलेली नाही. त्यामुळे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. येथील स्थायी अडतिये आणि विक्रेत्यांचा विचार करून प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
भाजी व फळ बाजारात धोका जास्त
भाजी बाजार पहाटे सुरू होऊन सकाळी ९ वाजता बंद होतो. पण त्या काळात नागपुरातील चिल्लर विक्रेत्यांची खरेदीसाठी गर्दी होते. या बाजारात मास्कचा उपयोग क्वचितच होत असल्याचे दिसून येते. कळमना युवा भाजी बाजार असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, जीव धोक्यात घालून दररोज व्यापार करीत आहे. या बाजारात कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अनेकजण मास्कचा उपयोगही करीत नाही. प्रशासनाचे अधिकारी या बाजारात कोरोनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. येथे दररोज अज्ञात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असते. गेल्यावर्षी वाढत्या गर्दीमुळे तत्कालिन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बाजार बंद करून शहरातील विविध भागातील मैदानात भाजी बाजार सुरू केले होते. अशीच स्थिती आता निर्माण झाली आहे. फळ बाजार अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, सध्या फळांची आवक वाढली असून दररोज होणाऱ्या फळांच्या लिलावादरम्यान ग्राहक आणि व्यापाऱ्यांची गर्दी असते. यावेळी प्रशासनाचे अधिकारीही हजर असतात, पण ते काहीही करीत नाहीत. त्यामुळे फळ बाजारात कोरोनाचा धोका जास्त वाढला आहे.