मिहानची काढली प्रेतयात्रा
By Admin | Updated: December 5, 2015 09:10 IST2015-12-05T09:10:17+5:302015-12-05T09:10:17+5:30
ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर मिहान प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

मिहानची काढली प्रेतयात्रा
एकरी ६० लाख भाव द्या
नागपूर : ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर मिहान प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी प्रकल्पग्रस्त शिवणगाववासीयांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मिहानची प्रेतयात्रा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जयताळाच्या धर्तीवर आमच्याही जमिनीला ६० लाख एकर भाव द्या, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
शिवणगावातील शेतकऱ्यांना शेतीचा वाढीव मोबादल, शहरात १२.५ टक्के विकसित जमीन, घरांचे पुनर्वसन व मोबदला, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मिहान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबा डवरे यांच्या नेतृत्वात मिहानची प्रेतयात्रा काढण्यात आली. वाजत-गाजत ही प्रेतयात्रा संपूर्ण गावात फिरविण्यात आली. प्रेतयात्रेत गावातील लहान मुले, महिलाही सहभागी झाल्या होत्या. सरकारविरुद्ध संताप व्यक्त करणारे नारे घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रेतावर मिहानचा विकास होत असेल तर तो आम्हाला मान्य नाही. आम्हाला न्याय केव्हा मिळणार, असा सवाल करीत प्रकल्पग्रस्तांनी मिहानच्या प्रेताला टॅक्सीवेच्या शेजारी अग्नी दिली.
गेल्या दहा वर्षापासून शिवणगाववासीयांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि सरकार दरबारी अनेक चकरा मारून शेतकऱ्यांच्या चपला झिजल्या आहेत. आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांनाही आमच्या मागण्यांचा विसर पडला आहे. त्यांनी वर्षभरात प्रकल्पग्रस्तांसोबत एकही बैठक घेतली नाही, तर आम्हाला काय न्याय देणार, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमिनीच्या विकासाच्या तीन वर्षांपासून निविदा काढण्यात येत आहे. शिवणगाव, गावठाण, नवे गावठाण, विक्तुबाबानगर येथील शेतकऱ्यांच्या ११६० घरांचा मोबदला हवा आहे. सरकारचा कागदोपत्री होणारा विकास शेतकऱ्यांना मरणाच्या दारात लोटत आहे. न्यायालयाने येथील शेतकऱ्यांसाठी एकरी पाच लाख रुपये वाढीव मोबदला ठरविला आहे. याउलट जयताळा येथील लोकांना एकरी ६० लाख रुपये देण्यात येणार आहे.
असा भेदभाव करून सरकार शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. या आंदोलनात रवी गुडधे, युवराज फुलझेले, अमोल वानखेडे, कुमार खोब्रागडे, संजय डवरे, अजय खोंडे, उमेश फलके, रमेश कुरणकर, चंद्रशेखर बर्डे, चेतन गानार, मोरेश्वर पिंपळकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)