मेट्रो रेल्वेसाठी एप्रिलमध्ये निधी
By Admin | Updated: October 15, 2015 03:14 IST2015-10-15T03:14:44+5:302015-10-15T03:14:44+5:30
जर्मनीची केएफडब्ल्यू बँक आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल) यांच्यात कर्जवाटप करार फेब्रुवारी २०१६ मध्ये ...

मेट्रो रेल्वेसाठी एप्रिलमध्ये निधी
जर्मन केएफडब्ल्यू बँकेचे संकेत : पुढील आठवड्यात अहवाल सादर करणार
नागपूर : जर्मनीची केएफडब्ल्यू बँक आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल) यांच्यात कर्जवाटप करार फेब्रुवारी २०१६ मध्ये होणार असून प्रकल्पाच्या उभारणीसाठी एप्रिलपासून टप्प्याटप्याने निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती बँकेच्या चमूचे प्रमुख फेलिक्स क्लोडा यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी बँकेच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाचे अधिकारी पीटर हिलिगेस आणि ‘एनएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मनपा आयुक्तांशी चर्चा
क्लोडा म्हणाले, सोमवारपासून पाच दिवसीय दौऱ्यावर आहोत. तीन दिवसात प्रकल्पाची पाहणी केली. मंगळवारी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी फिडर सर्व्हिस, बससेवेसह विविध बाबींवर झालेली चर्चा सकारात्मक होती. कामे याच वेगाने सुरू राहली तर मार्च-एप्रिलपासून ३७०० कोटी रूपये आवश्यकतेनुसार कंपनीला देण्यात येईल. क्लोडा म्हणाले, नागपुरात वाहतूक समस्या आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून किफायत दरात वेगवान आणि प्रदूषणरहित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाला अर्थपुरवठा करण्यासाठी केएफडब्ल्यू बँक पुढे आली आहे. निविदा प्रक्रिया जारी आहे. कार्याचा वेग पाहून चमूतील सर्व सदस्य प्रभावित झाले आहेत.
मंत्रालयात शुक्रवारी चर्चा
केएफडब्ल्यू बँकेचे अधिकारी प्रकल्प पाहून प्रभावित झाले आहेत. या प्रकल्पासाठी जर्मनीचे सहकार्य मिळत आहे. यावेळी प्रकल्पाचे टप्पे आणि कर्ज मंजुरीवर चर्चा झाली. ही चमू शुक्रवारी मुंबईत मंत्रालयात शहरी विकास आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
व्याजदरावर अधिकाऱ्यांचे मौन
क्लोडा यांनी नागपूर मेट्रो रेल्वेच्या कार्याच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले. या प्रकल्पासाठी कर्ज देण्यास बँक तयार आहे. दौऱ्याचा अहवाल पुढीलआठवड्यात बँकेच्या संचालकांसमोर ठेवण्यात येईल. त्यानंतरच कर्जाला अंतिम स्वरूप मिळेल. २० वर्ष मुदतीच्या कर्जासाठी आकारण्यात येणाऱ्या व्याजदरावर त्यांनी मौन पाळले.
पीटर हिलीगेस यांचे शिक्षण नागपुरात!
चमूत सहभागी पीटर हिलीगेस केएफडब्ल्यू बँकेच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात संचालक पदावर कार्यरत आहेत. ‘गेस्ट स्टुडंट’ म्हणून १९९१ मध्ये नागपूर विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. त्यांना या शहराची ओळख आहे. तेव्हाच्या आणि आताच्या नागपुरात बराच बदल झाला असून प्रकल्पाच्या विकास कामांवर समाधानी असल्याचे ते म्हणाले.