नागपूर - मुलाचे लग्न आहे, असे सांगून मित्राकडून दोन लाख रुपये घेणाऱ्या दाम्पत्याने आता मात्र रक्कम परत करण्याऐवजी मदत करणाऱ्याला धमकी दिली. अजनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिश्चंद्र तुमाणे (वय ६३, रा. सुमित नगर, झिंगाबाई टाकळी) आणि त्याची पत्नी गुंफा अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. उंटखाना येथील रहिवासी मनोहर रामजी पाये (वय ६०) आणि आरोपी तुमाने हे दोघे मित्र होय. मुलाचे लग्न आहे, असे सांगून २४ डिसेंबर २०१९ ते २७ डिसेंबर २०२० या कालावधीत तुमाणे दाम्पत्याने पायेकडून दोन लाख रुपये उधार घेतले. नंतर पुन्हा पायेचे मित्र सुरेश सोनकुसरे यांच्याकडूनही दोन लाख घेतले. ठराविक मुदत झाल्यानंतर पाये आणि सोनकुसरे यांनी आपली रक्कम परत मागितली असता आरोपी रक्कम देण्यास टाळाटाळ करूलागले. एवढेच नव्हे तर तुमाणे दाम्पत्याने पायेला फोनवरून ‘जे होते ते करून घे, रक्कम देणार नाही’ जास्त त्रास दिला तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्यामुळे पाये यांनी आरोपी तुमाने दाम्पत्याविरुद्ध अजनी ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
---