फ्रान्सच्या चमूचे मिशन मेट्रो रेल्वे
By Admin | Updated: March 25, 2015 02:18 IST2015-03-25T02:18:59+5:302015-03-25T02:18:59+5:30
नागपुरातील वाहतुकीला पर्याय ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फ्रान्स सरकारच्या कंपनी फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीची (एएफडी) कर्ज देण्याची तयारी आहे.

फ्रान्सच्या चमूचे मिशन मेट्रो रेल्वे
नागपूर : नागपुरातील वाहतुकीला पर्याय ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फ्रान्स सरकारच्या कंपनी फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीची (एएफडी) कर्ज देण्याची तयारी आहे. कर्ज देण्यापूर्वी प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी फ्रान्सची तीन सदस्यीय चमू गुरुवार, २६ मार्चला तीन दिवसीय दौऱ्यावर नागपुरात येत आहे.
ही चमू प्रस्तावित रेल्वे लाईनची पाहणी, स्थानिक प्रशासनाशी चर्चा, याशिवाय मेट्रो रेल्वेशी जुळलेल्या प्रत्येक भागधारकांशीही चर्चा करणार आहे. तसेच मिहान, शहर बसस्टॉप, मेट्रो रेल्वेचे प्रस्तावित कॅरिडार आदींचीही पाहणी करणार आहे. मेट्रो रेल्वेपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीच्या अन्य साधनांचीही माहिती ही चमू घेणार आहे.
फ्रान्सची चमू बंगळुरूमार्गे नागपुरात येणार असल्याची माहिती फ्रान्सच्या कंपनीने नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएमआरसी) दिली आहे. मेट्रो रेल्वेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नोव्हेंबर २००४ मध्ये आर्थिक प्रकरणांशी जुळलेल्या विभागाने (डीईए) फ्रान्सच्या सरकारी कंपनीच्या माध्यमातून नागपूर मेट्रो रेल्वेशी कर्ज देण्यासाठी संपर्क केला होता. एएफडीने २०० दशलक्ष युरो अर्थात १५०० कोटी रुपये कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतरही हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे. अधिकृत दौऱ्यानंतर कर्ज देण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दिल्ली येथे १३ मार्च रोजी झालेल्या कंपनीच्या पहिल्या संचालकांच्या बैठकीत फ्रान्सच्या चमूसंदर्भात विशेष योजना तयार केली होती. २६ मार्चला ही चमू मनपा आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची भेट घेणार आहे. २७ मार्चला नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आणि २८ मार्चला मिहानचा दौरा करणार आहे. आॅटोरिक्षा असोसिएशन आणि अन्य व्यावसायिक संघटनांच्या नेत्यांसोबत ही चमू चर्चा करणार आहे. (प्रतिनिधी)