रेल्वेतील १४०० कर्मचाऱ्यांची पदे गोठवा
By Admin | Updated: June 23, 2017 02:19 IST2017-06-23T02:19:17+5:302017-06-23T02:19:17+5:30
१९८० च्या दशकात भारतीय रेल्वेत एकूण २२ लाख रेल्वे कर्मचारी होते. परंतु मागील ३० वर्षांत रेल्वेगाड्यांची संख्या दहापटीने

रेल्वेतील १४०० कर्मचाऱ्यांची पदे गोठवा
रेल्वे बोर्डाचे निर्देश : खासगीकरणामुळे कर्मचारी ठरताहेत अतिरिक्त
दयानंद पाईकराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९८० च्या दशकात भारतीय रेल्वेत एकूण २२ लाख रेल्वे कर्मचारी होते. परंतु मागील ३० वर्षांत रेल्वेगाड्यांची संख्या दहापटीने वाढूनही रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या १२ लाखांवर आली आहे. खासगीकरणामुळे कर्मचाऱ्यांची पदे गोठविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेतील एक हजार आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील ४०० पदे गोठविण्याचा रेल्वे बोर्डाचा आदेश झोनस्तरावर येऊन ठेपला आहे. अशा पद्धतीने रेल्वे कर्मचाऱ्यांची पदे गोठविल्यास ही बाब रेल्वेसाठी घातक ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
भारतीय रेल्वेत खासगीकरणावर भर देण्यात येत आहे. दरवर्षी निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे गोठविण्यात येत आहेत. पूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर १८ आरक्षणाच्या तिकिटाचे काऊंटर होते. हे काऊंटर आता नऊवर आले आहेत. दिवसेंदिवस खासगीकरणाचे धोरण अवलंबण्यात येत असल्यामुळे कामाचा ताण वाढून कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. खासगीकरणामुळे प्रवाशांच्या समस्या वाढून त्याचा रेल्वेगाड्यांच्या संचालनावर विपरीत परिणाम होत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर सफाईचे कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदारांकडून सफाई कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्यामुळे त्याचा रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेवर परिणाम होतो. परंतु कर्मचारी कमी करण्याच्या नादात रेल्वे प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नुकतेच रेल्वे बोर्डाने विविध झोनमधील अतिरिक्त
कर्मचारी गोठविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेतील एक हजार कर्मचारी आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील ४०० कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहेत. खासगीकरणामुळे प्रवाशांना सुविधांऐवजी मनस्तापच होत आहे. रेल्वेने पेंट्रीकारचा ताबा कंत्राटदारांना दिला आहे. परंतु संबंधित कंत्राटदारांकडून प्रवाशांना निकृष्ट भोजनाचा पुरवठा होत असल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच प्रवासी गोंधळ घालताना दिसतात. ही बाब केवळ खासगीकरणामुळे होत असून रेल्वे प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
रेल्वेत एखादा अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाला की त्याचे पद गोठविण्यात येते. सुरक्षेला धारेवर धरून हे काम होत असल्यामुळे त्याचा मोठा धोका देशाला पत्करावा लागणार आहे. अपेक्षेपेक्षा अधिक रेल्वेगाड्या धावत आहेत. ही बाब रेल्वेच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. कितीही प्रगत तंत्रज्ञान आले तरी कर्मचाऱ्यांची जागा भरून निघू शकत नाही.
-प्रवीण डबली, माजी सदस्य, झेडआरयूसीसी, दपूम रेल्वे