लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्यासाठी सकाळ-संध्याकाळ उद्यानात फिरणाऱ्या नागरिकांकडून शुल्क वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याला शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक कापसे यांनी विरोध दर्शविला आहे. शुल्क आकारणी मागे न घेतल्यास या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नागपूर शहरात १७५ उद्याने आहेत. मनपाने ६९ उद्यानांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्यानात फिरणाऱ्यांना दररोज २० ते २५ रुपये शुल्क द्यावे लागेल. यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना उद्यानात जाता येणार नाही. पदाधिकाऱ्यांनी कर वसुलीकडे लक्ष न देता सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा दीपक कापसे यांनी दिला आहे.