शेतशिवारात वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:35+5:302021-01-13T04:19:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यातील बहुतांश भाग हा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगत आहे. जंगलव्याप्त भागातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असताे. वन्यप्राण्यांचे ...

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील बहुतांश भाग हा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगत आहे. जंगलव्याप्त भागातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असताे. वन्यप्राण्यांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासाडी करतात. विशेषत: रानडुकरे हाता-ताेंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.
वन्यप्राण्यांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. जंगलव्याप्त भागातील शेतकरी जिवावर उदार होऊन शेती कसतात. परंतु वन विभाग मात्र आपल्याच ताेऱ्यात असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. पिकांच्या नुकसानीबाबत वन विभागाकडे तक्रारी करूनही त्यावर कारवाई होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अताेनात नुकसान झाले. धान, कपाशीचे उत्पादन अर्ध्यावर, तर साेयाबीन पीक केवळ २५ टक्क्यांवर हाती लागले. असे असतानाही शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली. सध्या तूर व हरभरा पिके कापणीला आली आहेत. मात्र रानडुकरे व इतर वन्यप्राणी पिकात हैदाेस घालत असून, पिके नष्ट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगत हजाराे हेक्टर शेती आहे. वन्यप्राण्यांना हाकलून लावण्यासाठी शेतकरी नवनवीन प्रयाेग करतात. मात्र त्याचा काहीही उपयाेग हाेताना दिसत नाही. पिके वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करून शेतकरी धडपड करतात. मात्र वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने पिकांची प्रचंड नासाडी हाेत आहे. वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी वन विभाग यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने न्याय कुणाला मागायचा, या विवंचनेत शेतकरी आहेत. दुष्काळी परिस्थितीशी दाेनहात करताना वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी दमछाक हाेत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदाेबस्त करावा, अशी मागणी लक्ष्मण मोरघडे, बबन डेकाटे, विष्णू दिघोरे, अनिल बावणे, मनोहर मोरघडे, गंगाधर डहारे, लीलाधर धनविजय, अरुणा कलेवार, ईश्वर वाघमारे, उल्हास घुमडवार, खुशाल ठवकर, तुळशीदास कळंबे, सुनील खवास, नरेश शुक्ला, आनंदराव ठवकर, राजू गजभिये आदी शेतकऱ्यांनी केली आहे.