संध्याकाळीही हवी उद्यानांमध्ये ‘फ्री एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:46 IST2021-02-05T04:46:55+5:302021-02-05T04:46:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्तमानातील व्यस्त जीवनशैलीमध्ये नागरिक सहज होणाऱ्या वॉकिंगवर भर देत आहेत. आपल्या सोयीनुसार नागरिक सकाळ-संध्याकाळी ...

Free entry to desired parks even in the evening | संध्याकाळीही हवी उद्यानांमध्ये ‘फ्री एन्ट्री’

संध्याकाळीही हवी उद्यानांमध्ये ‘फ्री एन्ट्री’

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्तमानातील व्यस्त जीवनशैलीमध्ये नागरिक सहज होणाऱ्या वॉकिंगवर भर देत आहेत. आपल्या सोयीनुसार नागरिक सकाळ-संध्याकाळी वॉकिंगकरिता मैदाने, उद्यानांमध्ये येत असतात. शुद्ध वारा, हिरवळ आणि प्रसन्न वातावरणामुळे नागरिक उद्यानांना प्राधान्य देतात. मात्र, नागपूर महापालिकेने घातलेला उद्यानांच्या व्यावसायिकीकरणाचा घाट या आरोग्यप्रेमी नागरिकांवर निर्बंध आणतो आहे. महापालिकेच्या शहरातील ६९ उद्यानांच्या खासगीकरणाच्या व प्रवेशाकरिता शुल्क आकारणीच्या प्रस्तावाचा नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या प्रस्तावात मनपाने सकाळी ९ वाजता वॉकिंग करणाऱ्या कोणत्याही नागरिकांना पाच रुपये शुल्क द्यावे लागणार नाही, हे जरी स्पष्ट केले असले तरी या निर्णयाला समर्थन मिळत नसल्याचे दिसून येते. आरोग्यवर्धनासाठी एकवेळचेही बंधन नको, असे सांगत सकाळसोबतच संध्याकाळीही सर्वांनाच ‘फ्री एन्ट्री’चा अधिकार असल्याचा आवाज बुलंद केला जात आहे.

मनपाच्या उद्यान विभागाने १५ मोठे आणि ५४ लहान उद्यानांना खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव दिला होता. स्थायी समितीकडून मंगळवारी हा प्रस्ताव मंजूरही झाला आहे. उत्तम सेवा देण्यासाठी प्रवेश शुल्क आकारणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत मनपाच्या प्रस्तावाला समितीने योग्य ठरवले आहे. नाममात्र शुल्क आकारणीने मनपाकडे वार्षिक दहा कोटी रुपयांची बचत होणार असून, उद्यानाचे मेन्टेनन्सही उत्तम राहील, असा दावा समितीने केला आहे.

संध्याकाळीच महिला व मुलांचा राबता

सकाळच्या वेळी कौटुंबिक व्यस्ततेमुळे महिला उद्यानात जात नाहीत. संध्याकाळी त्या मुलांसोबत उद्यानांमध्ये फेरफटका मारत असतात. परंतु, मनपाने संध्याकाळी शुल्क आकारणीचा निर्णय घेतला आहे. महिलांकडून या निर्णयाचा विरोध होत आहे. यासोबतच नगरसेवकांनी बहुतांश उद्यानांमध्ये ग्रीन जिम उभे गेले आहेत. प्रवेशासाठी शुल्क वसुली झाली तर व्यायामाची ही साधने बिनकामाची ठरतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांना शुल्क आकारणी नको

सकाळी ९ वाजतानंतर कोणत्याही वयाच्या नागरिकांना उद्यान प्रवेशासासाठी शुल्क लागणार असल्याचे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. काही वेळ घालविल्यानंतर त्यांना ऊर्जा प्राप्त होत असते. त्यामुळे, ज्येष्ठ नागरिकांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना तरी किमान या शुल्क आकारणीपासून लांब ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. वयाच्या उत्तरार्धात बगीचे हे त्यांच्यासाठी वेळ घालविण्याचे उत्तम स्थान असते.

या आहेत अटी

- उद्यान प्रवेशासाठी ५ रुपये शुल्क लागेल. सकाळी ९ वाजतानंतर शुल्क आकारणी होईल.

- स्थानिक नगरसेवक व ज्येष्ठ नागरिकांची समिती तयार केली जाईल. ही समिती उद्यानांवर नजर ठेवेल.

- उद्यानांमध्ये बॅटरी ऑपरेटेड खेळण्यांवर ५ रुपये शुल्क आकारणी होईल.

- फूड झोनसाठी १५ बाय १० फुट जागेवर उद्यानांमध्ये एक निश्चित जागा असेल.

- नर्सरी व वृक्षारोपणाची परवानगी दिली जाईल. यासाठी जागा निश्चित केली जाईल.

- १२ वर्षाखालील लहान मुलांच्या विविध शालेय स्पर्धांसाठी सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजतापर्यंत परवानगी दिली जाईल.

- स्नेहमिलन व कौटुंबिक कार्यक्रमांत केवळ ५० आमंत्रितांनाच प्रवेश दिला जाईल.

- वैवाहिक सोहळे, पार्टींचे आयोजन होणार नाही.

.........

Web Title: Free entry to desired parks even in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.