काेराेना रुग्णांचा मुक्तसंचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST2021-04-06T04:09:06+5:302021-04-06T04:09:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात काटाेल शहरामध्ये ७०० च्या वर, तर ग्रामीण भागात ५५० च्या ...

काेराेना रुग्णांचा मुक्तसंचार सुरू
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात काटाेल शहरामध्ये ७०० च्या वर, तर ग्रामीण भागात ५५० च्या वर काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची नाेंद करण्यात आली. यातील बहुतांश रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचा डाॅक्टरांनी सल्ला दिला असला तरी, त्यांचा मात्र मुक्तसंचार सुरू आहे. या रुग्णांवर त्यांचे कुटुंबीय तसेच स्थानिक प्रशासनाचा वचक नाही. त्यामुळे त्यांचा हा हलगर्जीपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत आहे, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली आहे.
शहरासह तालुक्यातील ९५ टक्के काेराेना रुग्ण सध्या गृह विलगीकरणात आहेत. काटाेल तालुक्यात सध्या एकच काेविड केअर सेंटर असून, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, तिथे प्रत्येकाला बेड मिळणे शक्य नाही. त्यामुळे अनेकांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तालुक्यातील उपचाराची ताेकडी सुविधा पाहता, जिल्हा प्रशासनाने काटाेल शहरातील शुअरटेक हाॅस्पिटलमध्ये डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर निर्मितीची घाेषणा करून तिथे १४ खाटांची व्यवस्था केली. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्याने दाेन रुग्णांमागे एकाला नागपूरला उपचारासाठी पाठवावे लागत आहे.
अनेकांना काेविड केअर सेंटरमध्ये बेड मिळत नसल्याने मृत्युदरही वाढत आहे. काेराेनाने तालुक्यातील ६२ रुग्णांचा बळी घेतला आहे. शहरातील लता मंगेशकर हॉस्पिटल मोठे असल्याने तिथे डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटरला परवानगी गरजेची आहे. यासंदर्भात आढावा व निर्णय घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात एक बैठकही घेण्यात आली. यात वरिष्ठ अधिकारी व नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. त्या सूचनांची अंमलबजावणी कधी व कशी केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...
काेविड केअर सेंटरची गरज
तालुक्यातील काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर कुणाचेही नियंत्रण नाही. यातील अनेकांच्या मनात या आजाराबाबत गैरसमज असून, ते स्वत:चीही याेग्य पद्धतीने काळजी घेत नाहीत. यातील काहींचा मुक्तसंचार सुरू असल्याने ते सुपर स्प्रेडर बनत चालले आहेत. स्थानिक प्रशासनाला या रुग्णांबाबत माहिती असते. मात्र, कुणीही त्यांच्यावर कारवाई करण्याची तसदी घेत नाही. तालुक्यात सध्या फक्त एकच काेविड केअर सेंटर आहे. त्यामुळे रुग्णांची हाेणारी हेळसांड व काेराेनाचे संक्रमण थांबविण्यासाठी आणखी काेविड केअर सेंटर सुरू करणे गरजेचे आहे.