काेराेना संक्रमित रुग्णांचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:18+5:302021-03-14T04:09:18+5:30
बाबा टेकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या आणि त्यांचा मुक्तसंचार वाढत असल्याने एकीकडे नागरिकांमध्ये ...

काेराेना संक्रमित रुग्णांचा मुक्तसंचार
बाबा टेकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या आणि त्यांचा मुक्तसंचार वाढत असल्याने एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे नागरिकांवर वचक राहिला नसलेल्या प्रशासनाची अगतिकताही दिसून येत आहे. काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचा फज्जा उडाला असताना कुणीही याची गांभीर्याने दखल घेत नाही.
तालुक्यात काेराेनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल २०१० राेजी दहेगाव (रंगारी) येथे आढळून आला हाेता. त्यानंतर संक्रमण हळूहळू वाढत गेले आणि रुग्ण संख्या ४,१९३ वर पाेहाेचली. यातील ९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतरांनी काेराेनावर मात केली. घरातील कर्ते पुरुष काेराेनाने हिरावून नेल्याने काहींवर संकट काेसळले. पण, त्यांचे दु:ख समजून घ्यायला कुणीही सरसावले नाही. किंबहुना, त्यापासून कुणी धडाही घेतला नाही.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने दीर्घ काळ लाॅकडाऊन केले. या काळात अनेकांचे राेजगार केले तर प्रत्येकाचे अर्थकारण काेलमडले. कामगारांना शेकडाे किमीची पायपीट करीत मूळ गाव गाठावे लागले. दैनंदिन गरजा भागवणेही दुरपास्त झाले हाेते. काहींचा कर्जबाजारीपणातून नैराश्येकडे प्रवास सुरू झाला हाेता. लाॅकडाऊन हटविल्यानंतर परिस्थिती हळूहळू मूळ पदावर येत असतानाच दुसऱ्या टप्प्यातील संक्रमणाला सुरुवात झाली. परंतु, नागरिकांनीही यातून काहीही धडा न घेता बेजबाबदारपणा कायम ठेवला.
मध्यंतरी प्रशासनाने दंडात्मक कारवाई करीत बेजबाबदार नागरिकांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासनाची पाठ फिरताच नागरिकांचा हलगर्जीपणा कायम राहिला. या प्रकारामुळे प्रशासनाचाही नाइलाज झाला. बेजबाबदार नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी प्रशासनाने पाेलिसांची मदत घेत कठाेर कारवाई करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली.
...
३,९१३ जणांचे लसीकरण
तालुक्यात १६ जानेवारीपासून काेराेना लसीकरणाला सुरुवात झाली. दाेन महिन्यांत अर्थात १२ मार्चपर्यंत आराेग्य विभागाने ३,९१३ जणांचे लसीकरण पूर्ण केले. नागरिकांनीही या लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला. आधीच आराेग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला. त्यांच्या समस्यांचा विचार करण्यास कुणालाही सवड नाही.
...
सॅम्पल अन् रिपाेर्ट
चाचणी करताना एक सॅम्पल घेतले जात असून, त्यानंतर संबंधित व्यक्तीला पाॅझिटिव्ह, निगेटिव्हचा रिपाेर्ट दिला जाताे. रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही काय, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला असून, त्यासाठी केळवद (ता. सावनेर) येथील काेराेनाग्रस्त कुटुंबीयांचे उदाहरण दिले. वास्तवात, आराेग्य विभागातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत दाेन शिफ्टमध्ये कामे करावी लागत आहेत.
...
वयाेवृद्ध व्यक्तीशिवाय ४५ वर्षांपेक्षा अधिक वयातील व्यक्तींना शासनाने जारी केलेल्या २० आजारांपैकी काेणताही आजार असल्यास त्या व्यक्तीला लसीकरणासाठी विशिष्ट फॉर्मेटमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र आणावे लागते. त्या व्यक्तींचे शासकीय रुग्णालयात लसीकरण केले जाते. लसीकरणाला घाबरण्याची काहीही गरज नाही.
- डाॅ. प्रीतमकुमार निचत,
नाेडल वैद्यकीय अधिकारी.