त्या आदिवासी विद्यार्थ्यांना बसचा मोफत पास
By Admin | Updated: December 14, 2015 03:15 IST2015-12-14T03:15:55+5:302015-12-14T03:15:55+5:30
आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही,

त्या आदिवासी विद्यार्थ्यांना बसचा मोफत पास
नागपूर : आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा मोफत पास देण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी विधानसभेत दिले.
विधानसभा सदस्य वैभव पिचड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री सावरा म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या वतीने कार्यरत शासकीय आदिवासी वसतिगृहात सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात एकूण ५५,९९८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळालेला नाही, त्या विद्यार्थ्यांना एस.टी. बसचा पास देण्याचा शासनाचा सकारात्मक विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून विविध उपाययोजना
राज्यातील शेती व शेतकरी यांना चांगले दिवस यावेत यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कृषी, मदत व पुनर्वसन कार्य मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य वीरेंद्र जगताप, अमिन पटेल, असलम शेख, अब्दुल सत्तार, अमित झनक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मनातील नैराश्य दूर करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी समित्या नेमल्या आहेत.
याखेरीज शासनाने जलयुक्त शिवार, शेततळी, युरिया खताच्या किमती वाढू न देता मर्यादित ठेवणे, १४ जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बी.टी. कापूस बियाण्यांच्या दरात पिशवीमागे १०० रुपये व प्रति किलोमागे २५० रुपये कमी करणे, एक लाख हेक्टर क्षेत्रावर १०० टक्के अनुदानाने फळ झाड लागवड, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफी, दोन लाख रुपयांचे संरक्षण देणारा अपघात विमा, शेती कर्जाचे पुनर्गठन, व्याज माफी, सघन सिंचन, ५० टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांचे वाटप, शेततळी इत्यादी अनेक उपायायेजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितपणे कमी होतील, असा विश्वास कृषिमंत्री खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)