कॅब सर्व्हिसच्या नावाखाली टॅक्सी मालकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 21:50 IST2020-09-15T21:48:57+5:302020-09-15T21:50:29+5:30
कॅब सर्व्हिस सुरू करण्याच्या नावाखाली अनेकांची वाहने भाड्याने घेऊन त्यांची रक्कम थकविल्या प्रकरणी सदर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.

कॅब सर्व्हिसच्या नावाखाली टॅक्सी मालकांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅब सर्व्हिस सुरू करण्याच्या नावाखाली अनेकांची वाहने भाड्याने घेऊन त्यांची रक्कम थकविल्या प्रकरणी सदर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. पोलीस लाईन टाकळी येथील रहिवासी दिनेश चन्द्रिकाप्रसाद मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुभाष बंजारा याने काही महिन्यांपूर्वी कुक टॅक्सी ट्रॅव्हल्स कंपनी नागपुरात सुरु केली. सदरमध्ये या कंपनीचे ऑफिस होते. वेगवेगळ्या प्रकारची वाहने कॅब सर्व्हिसच्या नावाखाली आरोपी बंजारा याने भाड्याने घेतली. मिश्रा यांच्याकडून त्याने तीन वाहने घेतली. प्रतिमाह ३० हजार रुपये भाडे देण्याचा करारनामा केला. मात्र मिश्रा तसेच अन्य वाहन मालकांना आरोपी वंजारा आणि त्याच्या साथीदारांनी रक्कम दिली नाही. त्यांनी दिलेले धनादेशही बँकेत रक्कम नसल्यामुळे वाटत नव्हते. त्यामुळे गेल्या आठवड्यात वाहन मालकांनी वंजाराच्या ऑफिस समोर निदर्शनेही केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण फसवणुकीच्या प्रकरणाची माहिती सदर पोलिसांना होती. परंतु पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेक वाहन मालकाची फसवणूक करून बंजारा आणि त्याचे साथीदार पळून गेल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी मिश्रा यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.