भूखंड विक्रीत फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST2021-03-26T04:08:25+5:302021-03-26T04:08:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विकलेल्या भूखंडाची पुन्हा विक्री करून बेलतरोडीत सहा जणांनी एका वृद्धाची फसवणूक केली. तर वाठोड्यात ...

Fraud in plot sale | भूखंड विक्रीत फसवणूक

भूखंड विक्रीत फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विकलेल्या भूखंडाची पुन्हा विक्री करून बेलतरोडीत सहा जणांनी एका वृद्धाची फसवणूक केली. तर वाठोड्यात भूखंड विक्रीचा सौदा करून १० लाख रुपये घेऊनही त्या भूखंडावर ताबा देण्याऐवजी खरेदीदारास दोन भावांनी धमकी दिली. या दोन्ही प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत.

मुरलीधर अभिमान बागडे (वय ७०) यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री लोकमान्य गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष भीमराव कवडूजी सोनटक्के यांच्याकडून एक भूखंड विकत घेतला होता. बागडे यांनी तेथे तारेचे कंपाउंड टाकले. आपल्या नावाचा फलकही लावला. काही दिवसांनंतर आरोपी भीमराव सोनटक्के यांनी हा भूखंड प्रभा बाबुराव कांबळे यांना विकला आणि या दोघांनी दीप्ती कांबळे, प्रवीण कांबळे, भीमराव वागदे तसेच रितेश दुरुगकर यांच्या मदतीने १९ मे २०२० ते मार्च २०२१ यादरम्यान बागडे यांच्या भूखंडावरील तारेचे कंपाउंड तोडून बोर्ड फेकून दिला. बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

सर्वश्री नगरातील प्रवीण वासुदेवराव गवरे यांनी रामभाऊ बापूराव कन्नाके आणि विजय बापूराव कन्नाके या दोघांकडून १० जून २००३ रोजी वाठोड्यातील आदिवासी लेआउटमध्ये भूखंड विकत घेतला होता. त्यासाठी त्यांना १० लाख रुपये दिले होते. काही दिवसांपूर्वी या भूखंडाचा ताबा घेण्यासाठी गवरे तेथे गेले असता आरोपी कन्नाके बंधूंनी त्यांना पुन्हा २ लाख रुपयांची मागणी केली. ती देण्यास नकार दिल्यामुळे भूखंडाचा ताबा घेण्यास मज्जाव करून त्यांना शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली. गवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Fraud in plot sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.