१० टक्के व्याजाच्या नावावर सॉफ्टवेअर इंजिनीअरची १० लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 19:31 IST2022-08-04T19:30:44+5:302022-08-04T19:31:35+5:30
Nagpur News दरमहा १० टक्के व्याजाचे आमिष दाखवत गुजरातच्या एका व्यापाऱ्याने नागपुरातील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची १० लाख रुपयांनी फसवणूक केली आहे.

१० टक्के व्याजाच्या नावावर सॉफ्टवेअर इंजिनीअरची १० लाखांनी फसवणूक
नागपूर : दरमहा १० टक्के व्याजाचे आमिष दाखवत गुजरातच्या एका व्यापाऱ्याने नागपुरातील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची १० लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणात संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गिरीश चंद्रकांत मुथियान (४०, शिवएलाईट) हे एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. २०१३ ते जुलै २०२२ या कालावधीत ते मुंबईत कामाला होते. त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीतच कामाला असलेल्या तुषार व्होराशी त्यांची ओळख झाली होती. दोघांचीही मैत्री झाली व आर्थिक व्यवहारांमध्येदेखील ते एकमेकांचा सल्ला घ्यायला लागले. गुजरातच्या जामनगर येथील व्यापारी दीपक उडिचीकडे गुंतवणूक केली तर दरमहा १० टक्के व्याज मिळेल, असे व्होराने गिरीश यांना सांगितले.
व्होरानेदेखील रक्कम गुंतविल्यामुळे गिरीश यांनी उडिचीकडे व्होरा तसेच अंगडियाच्या माध्यमातून एप्रिल व मे २०२१ मध्ये ५ लाख ९० हजार रुपये पाठविले. उडीचीने प्रॉमिसरी नोट पाठविली व त्यामुळे गिरीश यांचा विश्वास आणखी वाढला. मे २०२१ मध्ये गिरीश यांनी उडिचीच्या बॅंक खात्यात ४ लाख १० हजार रुपये जमा केले. सुरुवातीला उडीचीने व्याजाची रक्कम दिली नाही. मात्र गिरीश यांनी विचारणा करताच त्याने जून ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत अडीच लाख रुपये व्याज म्हणून पाठविले. त्यानंतर मात्र उडिचीने व्याजाची रक्कम पाठविणे बंद केले. त्याचप्रमाणे गिरीश यांच्याशी बोलण्यास टाळाटाळ सुरू केली व नंतर फोन उचलणेदेखील बंद केले.
गिरीश यांनी व्होराला विचारणा केली असता त्याच्यासोबतदेखील असाच प्रकार झाल्याची बाब समोर आली. अखेर गिरीश यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दीपक उडिचीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.