अनिवासी भारतीयाची फसवणूक
By Admin | Updated: November 19, 2015 03:30 IST2015-11-19T03:30:33+5:302015-11-19T03:30:33+5:30
एका अनिवासी भारतीयाची शेती खरेदीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे.

अनिवासी भारतीयाची फसवणूक
नागपूर : एका अनिवासी भारतीयाची शेती खरेदीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणाची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करण्यासाठी अनिवासी भारतीयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. मनोज निहालचंद बालानी असे याचिकाकर्त्याचे नाव असून, त्यांची दुंबईत कंपनी आहे. याचिकेतील माहितीनुसार, २००७ मध्ये एका रतन नामक नागपूरकराने दुसऱ्याची शेती स्वत:च्या नावावर असल्याचे दाखवून, ही शेती बालानी यांना १ कोटी ४ लाख ६२ हजार ८९५ रुपयांत विकली. तसेच दुबईतील एका कंपनीच्या विक्रीतही फसवणूक केली.
बालानी यांच्या तक्रारीवरून दुबई पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या; परंतु तो दुबई सोडून भारतात परतला. दरम्यान, आरोपीवर कारवाई करण्यासाठी बालानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळे बालानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.(प्रतिनिधी)