नागपुरात घर देण्याच्या नावाखाली हडपली रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:39 PM2020-03-14T12:39:49+5:302020-03-14T12:41:16+5:30

पंतप्रधान घरकुल योजनेत घर मिळवून देण्याची बतावणी करून एका ठगबाजाने अनेकांची फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

Fraud in the name of giving a house in Nagpur | नागपुरात घर देण्याच्या नावाखाली हडपली रक्कम

नागपुरात घर देण्याच्या नावाखाली हडपली रक्कम

Next
ठळक मुद्देपंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभाचे आमिष पोलिसांकडून तक्रारी थंडबस्त्यात

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान घरकुल योजनेत घर मिळवून देण्याची बतावणी करून एका ठगबाजाने अनेकांची फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ठगबाजाने लाखोंची रक्कम हडपली अन् तक्रार करून तीन महिने झाले तरी पोलिसांनी कारवाई करण्याची तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे रक्कम गमविणारे पीडित अस्वस्थ झाले आहेत. ते ठगबाजाचा शोध घेतानाच त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून इकडे तिकडे धावाधाव करीत आहेत. ठगबाजाचे नाव अंकित ऊर्फ अक्षय पराये आहे. तर तक्रार करणारे सर्वच्या सर्वच अत्यंत गरीब कुटुंबांतील आहेत. रोज कमविणे आणि खाणे, असा त्यांचा दिनक्रम आहे.
कैलास विष्णूजी सेलवटकर यांनी अन्य तक्रारकर्त्यांच्या वतीने हुडकेश्वर पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, अंकित ऊर्फ अक्षय पराये हा सेतू कार्यालयात काम करायचा. त्यामुळे तेथे कागदपत्रे तयार करण्यासाठी आलेल्यांसोबत त्याचा संपर्क येत होता. अंकित याच्यासोबत असाच सेलवटकरांचा संबंध आला. अंकितने त्यांना आपली नागपूर सुधार प्रन्यासमध्ये ओळख आहे, असे सांगून त्याने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या घरकुल योजनेत घर मिळवून देऊ शकतो, असे म्हटले. योजनेची सुरू असलेली प्रक्रिया केवळ दाखविण्यासाठी असून, ज्यांची सेटिंग आहे, त्यांनाच ही घरे मिळणार असल्याचीही मखलाशीही त्याने केली. त्यामुळे घरकुलाचे स्वप्न रंगविणाऱ्या सेलवटकरसह अनेकांनी त्याच्यावर विश्वास टाकून त्याने सांगितल्याप्रमाणे आधी त्याला जून ते जुलै २०१९ मध्ये १०,५६० रुपये दिले. त्यानंतर ठगबाज अंकितने या सर्वांकडून आधार, पॅन, रेशनकार्ड, बँकेचे पासबुक, विजेचे बिल, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि दोन फोटो घेतले.
पुन्हा ७,५०० रुपये आणि त्यानंतर ४२,५०० रुपये द्यावे लागतील, त्यानंतर तुम्हाला घराची चावी मिळेल. बाकीची ६ लाख ४० हजारांची रक्कम १२ वर्षात दर महिन्याला ठरवून दिलेल्या हप्तेवारीने (किस्त) भरावी लागेल, अशी त्याने यावेळी थाप मारली. नंतर त्याने ओटीपी एसएमएस कन्फर्मेशनच्या नावाखाली ७५०० रुपये घेतले. नंतर अ‍ॅग्रिमेंटच्या नावाखाली त्याने आॅगस्ट महिन्यात ४२,५०० रुपये मागणे सुरू केले.
रक्कम घेतली अन् गायब झाला
४२२ ते २५ नोव्हेंबर २०१९ ला त्याने नासुप्र कार्यालयासमोरच अनेकांकडून प्रत्येकी ४२, ५०० रुपये घेतले आणि काम करून येतो, असे म्हणून त्याने सर्वांना नासुप्र परिसरात बाहेरच थांबायला सांगितले.
४सायंकाळ झाली, नासुप्रचे कार्यालय बंद झाले तरी तो परत आला नाही. त्यामुळे पीडितांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याच्या मोबाईलवर वारंवार फोन करूनही तो प्रतिसाद देत नसल्यामुळे पीडित हादरले. त्यांनी पुढचे अनेक दिवस सेतू तसेच त्याच्या घरी त्याला शोधले. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. त्याच्या पत्नीशी पीडितांनी संपर्क केला असता तो घरून निघून गेला आणि त्यामुळे आपण माहेरी आल्याचे ती सांगत असल्याचे सेलवटकर आणि अन्य पीडितांनी तक्रारीत नमूद केले आहे.
गंभीर दखल घेऊ : उपायुक्त निर्मलादेवी
विशेष म्हणजे, ठगबाज अंकितची डिसेंबर २०१९ मध्येच हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ चारच्या कार्यालयातही तक्रार देण्यात आली. मात्र, पोलिसांकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. हा प्रकार आणि तक्रारीच्या अनुषंगाने परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांच्याशी चर्चा केली असता त्यांना हा प्रकारच कळविण्यात आला नसल्याचे उघड झाले. आज त्यांनी या संबंधाने बोलताना सोमवारपर्यंत या फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

Web Title: Fraud in the name of giving a house in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.