जमिनीच्या व्यवहारात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:09 IST2021-01-20T04:09:40+5:302021-01-20T04:09:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - साडेचार कोटीत मालमत्ता विकल्याचा तीन वर्षांपूर्वी साैदा करून खरेदीदाराकडून ३९ लाख रुपये घेणाऱ्या आरोपींनी ...

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - साडेचार कोटीत मालमत्ता विकल्याचा तीन वर्षांपूर्वी साैदा करून खरेदीदाराकडून ३९ लाख रुपये घेणाऱ्या आरोपींनी तीच मालमत्ता पुन्हा दुसऱ्यांना विकली. खरेदीदाराने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली ठाण्यात या प्रकरणी वामन शंकरराव कोहाड (वय ६३, रा.राणी दुर्गावती चौक) आणि राजू चित्तरंजन गोसेवाडे (वय ५०, रा.कोठी रोड, महाल) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
मोहम्मद जुबेर एचबी अशरफी (वय ४४, रा. चंद्रलोक बिल्डींग) यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी कोहाड आणि गोसेवाडे यांनी १३ नोव्हेंबर २०१७ ला नरसाळ्यातील खसरा क्रमांक १२४ तसेच भिलगावमधील खसरा क्रमांक १०१ च्या जमिनीचा साैदा ४ कोटी, ५१ लाखांत केला. त्याबदल्यात जुबेर यांच्याकडून आरोपींनी ३९ लाख रुपये रोख आणि चेकच्या माध्यमातून घेतले. नंतर मात्र या जमिनीची विक्री करून न देता दुसऱ्याला विकली. गेल्या तीन वर्षांपासून या संबंधीचा वाद सुरू आहे. आरोपींनी रक्कमही परत केली नाही. त्यामुळे जुबेर यांनी ५ जानेवारीला कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदवली. कागदपत्रांच्या आधारे तपास केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात कोहाड आणि गोसेवाडेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----
सराईत ठगबाज
आरोपी कोहाड आणि गोसेवाडे हे सराईत गुन्हेगार आहेत. जमिनीच्या अनेक वादग्रस्त व्यवहारात त्यांची नावे आली आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही पोलिसांकडे तक्रारी झाल्या आहेत.
----