फ्रान्स अन् जर्मनी उचलणार मेट्रोच्या कर्जाचा भार

By Admin | Updated: June 13, 2015 02:53 IST2015-06-13T02:53:00+5:302015-06-13T02:53:00+5:30

नागपूर मेट्रो साकारण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कर्जाचा प्रश्न आता जवळपास मिटला आहे.

France and Germany will pick up the weight of the Metro loan | फ्रान्स अन् जर्मनी उचलणार मेट्रोच्या कर्जाचा भार

फ्रान्स अन् जर्मनी उचलणार मेट्रोच्या कर्जाचा भार

मुख्यमंत्र्यांनी घेतला प्रगतीचा आढावा
नागपूर : नागपूर मेट्रो साकारण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कर्जाचा प्रश्न आता जवळपास मिटला आहे. फ्रेंच डेव्हलपमेंट कंपनी (एएफडी) व जर्मन सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत केएफडब्ल्यू डेव्हलपमेंट बँकेने मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी लागणारे संपूर्ण कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. कर्ज वितरणाऱ्या अटी व शर्तींवर चर्चा करण्यासाठी २४ जून रोजी दिल्ली येथे केएफडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात कर्जपुरवठ्याशी संबंधित बऱ्याच बाबी स्पष्ट होतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रामगिरी येथे एनएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्याकडून मेट्रो रेल्वेच्या आजवरच्या प्रगतीचा आढावा घेतला. या चर्चेत दीक्षित यांनी संपूर्ण कर्ज देण्याबाबत फ्रान्स व जर्मनी या दोन्ही देशातील कंपन्यांनी तयारी दर्शविल्याचे स्पष्ट केले. आजवर संबंधित दोन्ही देशाच्या कंपन्या कर्जाचा काही भाग देण्यास तयार होत्या. मात्र, मेट्रो प्रकल्पाला मिळालेली गती, राज्य व केंद्र सरकारकडून घेतले जाणारे सकारात्मक निर्णय पाहता संबंधित कंपन्यांनी आता संपूर्ण ४५२१ कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे.
जर्मन सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत केएफडब्ल्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएमआरसीएल) कार्यालयाला भेट देत कमी व्याजदरात कोट्यवधींचा आर्थिक पुरवठा करण्याची तयारी दर्शविली होती. या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची माहिती जाणून घेत एनएमआरसीएलच्या साईटला भेट दिली होती. आता २४ जून रोजी दिल्ली येथे केएफडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांसोबत मेट्रो रेल कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत नगर विकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)
डीएमआरसीची चमू १६ ला येणार
दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनची चमू १६ जून रोजी नागपुरात येत आहे. ही चमू पुन्हा एकदा साईटची पाहणी करेल. सोबतच तांत्रिक बाबींवर चर्चा होईल. दरम्यान, मेट्रो रेल्वेसाठी अंतर्गत सल्लागाराचे काम करीत असलेल्या ‘राईट्स’च्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट दिली. भविष्यात काढावयाच्या निविदा, करावयाची कामे आदी बाबींवर त्यांनी दीक्षित यांच्याशी चर्चा केली.

Web Title: France and Germany will pick up the weight of the Metro loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.