मदत करणाऱ्यांच्या आश्रयामुळे मिळेनात कोल्हे बंधू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:20+5:302021-03-04T04:13:20+5:30
नागपूर : गुंतवणुकीच्या नावावर ३५ कोटी रुपयांची फसवणूक करून फरार असलेला सुशील कोल्हे, त्याचा भाऊ पंकज कोल्हे आणि साथीदार ...

मदत करणाऱ्यांच्या आश्रयामुळे मिळेनात कोल्हे बंधू
नागपूर : गुंतवणुकीच्या नावावर ३५ कोटी रुपयांची फसवणूक करून फरार असलेला सुशील कोल्हे, त्याचा भाऊ पंकज कोल्हे आणि साथीदार भरत साहूचा चार महिन्यानंतरही काहीच पत्ता लागला नाही. पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळाल्यामुळे ते हाती लागत नाहीत. त्यामुळे कोल्हे बंधूंपासून पीडित असलेले नागरिकही समोर येण्यास टाळाटाळ करीत आहेत.
कोल्हे बंधूंवर ३ टक्के मासिक व्याज आणि बोनस देण्याची बतावणी करून ३५ कोटींची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल आहे. सीताबर्डी पोलिसांनी ७ नोव्हेंबर २०१९ रोजी हा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास आर्थिक शाखा करीत आहे. कोल्हे बंधूंना सुरुवातीपासूनच पोलिसांचा आश्रय मिळालेला आहे. सुशील कोल्हेने सीताबर्डी पोलिसांना विश्वासात घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याची हिंमत वाढली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या तत्परतेमुळे कोल्हे बंधूंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. कोल्हे बंधूंची सिव्हील लाईन्सच्या उत्कर्ष अलंकार अपार्टमेंटमध्ये डिजिटल अॅडव्हर्टाईझमेंट कंपनी एजीएम काॅर्पोरेशन होती. त्या माध्यमातून तो गुंतवणूकदारांना चौकात डिजिटल बोर्ड लावून मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीचे कंत्राट देण्याची बतावणी करीत होता. त्यांनी सुरुवातीला एजंट आणि गुंतवणूकदारांना व्याज आणि बोनस दिला. त्यानंतर गुंतवणूकदारांची रक्कम हडपणे सुरू केले. प्रकरणाच्या तपासात कोल्हे बंधूंचा उमरेड येथील साथीदार अजय लधवे यास अटक करण्यात आली. तो न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहे. त्याची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. सूत्रानुसार कोल्हे बंधूंची पोलिसात चांगली ओळख आहे. त्यांनी पोलीस नाईटसह अनेकदा आर्थिक सहकार्यही केले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय पोलीस विभागाशी निगडित काही नागरिकांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोल्हे बंधूंना पकडण्यात यश आलेले नाही. कोल्हे बंधूंनी कुटुंबीयांसह अनेक नागरिकांच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे. त्यांनी छत्तीसगडमध्ये तीन एकर जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी कुटुंबीयांच्या नावे केली आहे. तसेच लधवेने आपल्या एका साथीदाराच्या नावावर अनेक प्लॉटची रजिस्ट्री केली आहे. त्याच्या साथीदाराकडे उत्पन्नाचा कोणताच पर्याय नाही. कोल्हे बंधूंच्या कार्यालयात युवतींची फौज काम करीत होती. त्या युवतीही फसवणुकीत सहभागी आहेत. एका युवतीला बैतूल पोलिसांनी अटक केली आहे. तिलाही आरोपी केल्या जाऊ शकते.
.............
तक्रारीस टाळाटाळ करीत आहेत पीडित
तपासात मंदगती असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार समोर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. आतापर्यंत चार ते पाच कोटी रुपयाच्या फसवणुकीच्या तक्रारीच मिळाल्या आहेत. परंतु शेकडो नागरिकांची फसवणूक झाली आहे. ते मध्य प्रदेश तसेच छत्तीसगडमधील रहिवासी आहेत.
............