चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Updated: March 20, 2015 02:39 IST2015-03-20T02:39:28+5:302015-03-20T02:39:28+5:30

महाविद्यालयाच्या रेकॉर्डवर बोगस विद्यार्थी दाखवून लाखो रुपयांची शिष्यवृत्ती हडपणाऱ्या चार आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च ..

Fourth anticipate bail application is rejected | चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नागपूर : महाविद्यालयाच्या रेकॉर्डवर बोगस विद्यार्थी दाखवून लाखो रुपयांची शिष्यवृत्ती हडपणाऱ्या चार आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटाळून लावला. सर्व आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील सावली येथील साईराम बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेचे पदाधिकारी आहेत.
रोहित बोम्मावार (अध्यक्ष), राकेश पेद्दूरवार (उपाध्यक्ष), विजय कुरेवार (सचिव) व सूरज बोम्मावार (कोषाध्यक्ष) अशी आरोपींची नावे आहेत. संस्थेद्वारे संचालित चामोर्शी येथील राहुलभाऊ बोम्मावार व्यवस्थापन व तंत्रज्ञान महाविद्यालयात अनुसूचित जमाती प्रवर्गातील बोगस विद्यार्थी दाखवून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत १ कोटी ६ लाख ३१ हजार १५ रुपयांची शिष्यवृत्ती उचलण्यात आली आहे. २७ डिसेंबर २०१४ रोजी चामोर्शी पोलिसांनी प्रकल्प अधिकारी लोखंडे यांच्या तक्रारीवरून चारही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०९ (विश्वासघात), ४२० (फसवणूक) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
सुरुवातीला गडचिरोली सत्र न्यायालयाने आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनीही आरोपींना दिलासा नाकारला. परंतु, आरोपींना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी एक आठवड्यापर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन लागू ठेवण्यात आला आहे. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल लद्धड यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Fourth anticipate bail application is rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.