Fourstar Rating to Five Projects of Public Works Department | सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाच प्रकल्पांना फोरस्टार रेटिंग 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाच प्रकल्पांना फोरस्टार रेटिंग 

ठळक मुद्देदहाव्या ग्रीह परिषदेत अभियंत्यांचा सत्कारस्टार रेटिंगमध्ये २५ इमारतींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हरित इमारतीच्या संकल्पनेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २५ इमारतींचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी ५ इमारत प्रकल्पांना फोरस्टार रेटिंग तर ९ इमारत प्रकल्पांना थ्री स्टार रेटिंग देण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रीह कौन्सिल तसेच द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी) यांच्या संयुक्त विद्यमाने दहाव्या रिजनल ग्रीह कौन्सिलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिल सगने, ग्रीह कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ, मुख्य अभियंता उल्हास देबडवार आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘फोर स्टार रेटिंग’ मध्ये समावेश करण्यात आलेल्या इमारतीमध्ये नागभवन, फॅमिली कोर्ट, बांधकाम भवन परिसरातील मुख्य अभियंता कार्यालय, उपमुख्य वास्तुविशारद यांचे कार्यालय तसेच राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाचा समावेश आहे. हरित इमारतीचा थ्री स्टार दर्जा मिळालेल्या बांधकाम प्रकल्पामध्ये रविभवन, हैदराबाद हाऊस, न्यू हैदराबाद हाऊस, विधान भवन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टी.बी. हॉस्पिटलचा स्कीन वॉर्ड, आयुर्वेदिक महाविद्यालयाची इमारत, मनोरुग्णालयाची प्रशासकीय इमारत, राजभवन, संत मुक्ताबाई गर्ल्स होस्टेल या नऊ इमारतीचा समावेश आहे.
हरित इमारत संकल्पना साकार केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चे उपअभियंता चंद्रशेखर गिरी, शाखा अभियंता राजेंद्र्र बारई तसेच रविभवन येथील शाखा अभियंता अजय पाटील यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
हरित इमारतीच्या टू स्टार रेटिंगमध्ये जिल्हा न्यायालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ई.एस.आय.एस. चे हॉस्पिटल, कलेक्टर ऑफिस, प्रियदर्शिनी महिला वसतिगृह, अधीक्षक अभियंता व्हिजिलन्स अ‍ॅन्ड क्वॉलिटी कट्रोल ऑफिस, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच प्रशासकीय इमारत क्रमांक दोनचा समावेश करण्यात आला आहे. केवळ स्टार रेटिंग असलेल्या इमारतींमध्ये अधिक सुविधा निर्माण करून दर्जा वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी पर्यावरण सक्षम बांधकाम संदर्भातील धोरण पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.


Web Title: Fourstar Rating to Five Projects of Public Works Department
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.