लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : चार वर्षीय बालक कुणाचेही लक्ष नसताना जेवण करण्यासाठी अंगणवाडीच्या स्वयंपाक खोलीत गेला. आत कुणीही नसल्याचे समजून अंगणवाडी सेविकेने दार बंद करून कुलूप लावले. दुसरीकडे, तो बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी (दि. १८) सायंकाळी पोलिसात दाखल करून कुटुंबीयांनी शोध मोहीम सुरू केली. त्याच्याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. तो स्वयंपाक खोलीत असल्याचे गुरुवारी (दि. १८) सकाळी आढळून आले. हा प्रकार त्याच्या आईच्या दुर्लक्षामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिमांशू विश्वजीत बागडे (४, रा. वॉर्ड क्रमांक-४, बोरकर लेआउट, खापरखेडा, ता. सावनेर) हा बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास खापरखेडा येथील रणछोडदास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात गेला होता. याच ठिकाणी अंगणवाडी असून, कुणाचेही लक्ष नसताना दार उघडे असल्याने तो अंगणवाडीच्या स्वयंपाक घरात शिरला. त्यावेळी अंगणवाडी सेविका कामानिमित्त शाळेच्या कार्यालयात गेली होती. परत येताच तिथे आत कुणीही नसल्याने दार बंद करून कुलूप लावले आणि घरी निघून गेली.
तो घरी परत न आल्याने तसेच परिसरात दिसेनासा झाल्याने कुटुंबीय घाबरले. त्यांनी हिमांशू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करीत त्याचा शोध सुरू केला. खापरखेडा पोलिस व नागपूर शहर पोलिस गुन्हे शाखेनेही शोध सुरू केला. वरिष्ठ पोलिस अधिकारी खापरखेड्यात दाखल झाले. पथकातील श्वान त्याच्या घरापासून २०० मीटरचा परिसर व नाल्यापर्यंत फिरले. वीज केंद्राच्या क्यूआरटी व स्थानिक तरुण पहाटेपर्यंत त्याचा परिसरात शोध घेत होते. सकाळी फॉरेन्सिक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, कुठेही त्याचा थांगपत्ता लागला नाही. अंगणवाडी सेविकेने नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी १० वाजता अंगणवाडीचे दार उघडले आणि तिला हिमांशू आत बसून असल्याचे दिसले. पोलिसांनी अंगणवाडी गाठताच नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वैद्यकीस तपासणी केली आणि कुटुंबीयांच्या सुपुर्द केले.
बयाणात विसंगती
हिमांशू बुधवारी सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या दरम्यान खेळायला घराबाहेर गेल्याची माहिती त्याच्या आईने पोलिसांना बयाण नोंदविताना दिली. दुसरीकडे, अंगणवाडी सेविका लीलाबाई काकडे या रोज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंगणवाडीला कुलूप लावून घरी जातात. त्या बुधवारी देखील सायंकाळी ४ वाजता घरी गेल्या होत्या, असे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्या आईच्या बयाणात विसंगती दिसून आली.
हिमांशू अंगणवाडीचा विद्यार्थी नाही
हिमांशूचा अंगणवाडीत प्रवेश नसल्याने तो विद्यार्थी नाही. मात्र, तो रोज अंगणवाडीत येतो व जेवण करतो. बुधवारी सायंकाळी तो जेवण करण्यासाठी आला होता. तो आत गेल्याने लीलाबाईसह अन्य कुणालाही दिसले नाही. आई त्याच्या संगोपनाकडे लक्ष देत नसल्याने तसेच त्याला घरी वेळीच पुरेसे जेवण मिळत नसल्याने तो भूक शमविण्यासाठी अंगणवाडीत येतो व दिवसभर तिथे राहतो, असेही पोलिस तपासात निष्पन्न झाले. ठाणेदार हरिश रूमकर यांनी त्याच्या आईला सक्त ताकीद दिली आहे.
Web Summary : A four-year-old boy went missing from Anganwadi. He was accidentally locked inside the kitchen. After an overnight search, he was found safe. Negligence and conflicting statements from the mother emerged during the investigation. The boy often visited the Anganwadi for food.
Web Summary : एक चार वर्षीय लड़का आंगनवाड़ी से लापता हो गया। वह गलती से रसोई में बंद हो गया। रात भर की खोज के बाद, वह सुरक्षित पाया गया। जांच के दौरान मां की लापरवाही और विरोधाभासी बयान सामने आए। लड़का अक्सर खाने के लिए आंगनवाड़ी जाता था।